| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अधिक काम अधिक वेतन या नैसर्गिक न्याय तत्वाने व शासनाच्या धोरणानुसार सदर मागणी ही अतिशय रास्त व न्याय असुनही याबाबत शासन स्तरावरुन विशेषतः महसूल विभागाकडून नायब तहसिलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही. त्यामुळे तहसिलदार व नायब तहसिलदारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे बाबत सोमवारी (दि.3) बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष सचिन शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आले आहे. सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सदर रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्विकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेद्वारे घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना (नाशिक मुख्यालय) च्या रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन शेजाळ यांनी सांगितले.
पनवेल तहसीलदारांसह 6 नायब तहसीलदार सहभागी
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल महसूल कार्यालयातील तहसीलदार विजय तळेकर व 6 नायब तहसीलदार यांनी आजपासून (दि.3) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. पनवेल महसूल कार्यालयातील तहसीलदार व नायब तहसिलदारांनी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला असून पनवेल महसूल कार्यालयाचे कामकाज सोमवारी पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.