कंपनी व्यवस्थापनाबरोबर सकारात्मक चर्चा; शेकाप नेते प्रीतम पाटील यांचा पाठींबा
। चिरनेर/उरण । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी सर्वपक्षीय पनवेल-उरण लॉरी चालक-मालक संघटना आक्रमक होऊन त्यांनी कंपनीच्या गेटवर चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. यावेळी कंपनीने चर्चेसाठी बोलावून सकारात्मक चर्चा करून सोमवारी (दि.21) कंपनी मालकाबरोबर बैठक बोलविण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे तुर्तास आंदोलन स्थगित करून न्याय मिळाला नाहीतर मंगळवार दि. 22 ऑक्टोबरपासून पुन्हा चक्काजाम आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे.
उरण येथील एका बंदरातुन दररोज सुमारे 250 अवजड ट्रकमधून कोळशाची वाहतूक केली जात आहे. या बंदरातील कोळसा वाहतुकीचे काम चाणजे येथील एका स्थानिक ठेकेदाराला दिला आहे. मात्र, कोळसा वाहतुकीचे काम स्थानिक उरण-पनवेल लॉरी चालक-मालक संघटनेलाही विभागुन देण्याची मागणी कंपनी व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाकडे केली होती. मात्र, संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने 30 सप्टेंबरपासून कोळसा वाहतूक बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर चाणजे येथील स्थानिक ठेकेदारांनीही हद्दीतील प्रकल्पातील कामांवर प्रथम स्थानिक भुमीपुत्र प्रकल्पग्रस्तांचाच अधिकार आहे. यानंतरच इतरांना कामे देण्याबाबत विचार केला जाईल, अशी भूमिका घेतली होती. यावर तोडगा काढण्यासाठी उरण पोलिसांनी 30 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली होती. या बैठकीत सात दिवस आंदोलन स्थगित करण्याची विनंती उरण पोलिसांनी केली होती.
परंतु, या बैठकीत बोलणी फिस्कटल्याने कंपनीच्या गेट समोर मंगळवारी (दि.8) उरण-पनवेल ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संतोष घरत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनाला शेकाप नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, व शेकापचे जिल्हा खजिनदार प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच, संघटनेचे उपाध्यक्ष सुहास घरत, माजी अध्यक्ष रघु घरत, सुनील घरत, माजी सभापती नरेश घरत, कामगार नेते रवी घरत, पंडीत घरत, संकेत ठाकूर, सी.जी. घरत, रमाकांत म्हात्रे, बाळू घरत, प्रदिप पाटील, माजी जि.प. सदस्य डॉ. मनिष पाटील, अविनाश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, भगवान तांडेल, सुरेश पाटील, रुपेश पाटील, अरुण नाईक, सागर म्हात्रे, रोहित चंदणेसह इतर पदाधिकारी, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी कंपनी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. चर्चेसाठी कंपनीतर्फे हसमुख शहा यांनी कंपनीचे मालक परदेशात असून ते येत्या काही दिवसांत आल्यानंतर त्यांच्याबरोबर संयुक्त बैठक लावून योग्य तो मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे 21 ऑक्टोबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थानिकांना कामे देण्याची मागणी
उरण-पनवेल ट्रक चालक-मालक संघटनेने जाहीर केल्यानंतर मंगळवारी बंदराच्या प्रवेशद्वारावरच संघटनेने ठिय्या मांडून अवजड वाहनांतून होणारी कोळसा वाहतुक रोखून धरून बंद पाडली. यामुळे दोन किलोमीटर अंतरापर्यंत अवजड वाहनांची रांग लागली होती. मात्र, यावेळी बंदराचे प्रतिनिधी म्हणून हसमुख शहा, हरिदास बिराजदार यांनी संघटनेचे पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यात सीएसआर फंडातून गावासाठी निधी व स्थानिकांना 80 टक्के कामे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सनदशीर मार्गाने स्थानिकांना न्याय मिळावा. तो जर मिळत नसेल आम्ही स्थानिक प्रकल्पग्रस्त ट्रक चालक-मालक संघटनेच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देऊ.
– प्रीतम म्हात्रे, खजिनदार, शेकाप रायगड