राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार: साम्या कोरडे

घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करून नजरकैदेत ठेवल्याचा आरोप

| मुंबई | प्रतिनिधी |

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता मुंबईतही उमटले आहेत. आवाज दडपण्यासाठी मुंबईत विद्यार्थ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा, आंदोलकांवर नजर आणि हालचालींवर निर्बंध घातले जात असल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांनी सरकार आणि मुंबई पोलिसांवर जोरदार टीका केली. दिल्लीत आंदोलन सुरू असेपर्यंत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातही आंदोलन सुरूच राहील. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर देशाचा प्रत्येक कोपरा जंतरमंतर बनेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या दोन दिवसांपासून आपल्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करून नजरकैदेत ठेवल्याचा आरोप ॲड. कोरडे यांनी केला. एका वेगळ्या पोलीस ठाण्यात नेऊन बराच वेळ कोणाशीही फोनवर बोलू दिले नाही, असे सांगत त्यांनी या कारवाईचा निषेध केला. अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा आहे का? सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची एवढी भीती का वाटते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


महाविद्यालयात शिकणाऱ्या 20 ते 25 वर्षांच्या तरुणांना ताब्यात घेणे, त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करणे, फोन करून आंदोलनात सहभागी होणार का, अशी विचारणा करणे, हे प्रकार सुरू असल्याचा आरोप कोरडे यांनी केला. एका विद्यार्थ्यामागे दोन-दोन पोलीस व्हॅन तैनात केल्या जात असल्याचे सांगत, मुंबई पोलिसांकडे इतर कामे उरली नाहीत का, असा सवाल त्यांनी केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असून, शहरात जणू आणीबाणीच लागू केल्याचे चित्र निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली. आपल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लोकेशन ट्रेस करून वडाळा पोलिसांनी घराबाहेर फौजफाटा उभा केल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकांना वैयक्तिक कामासाठी बाहेर पडताना अडथळे येत असतील, तर ही कोणती लोकशाही, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला.

लढा सुरूच राहील!
मुंबई पोलिसांनी ॲड. साम्या कोरडे यांना ताब्यात घेऊन जात असताना उपस्थित विद्यार्थ्यांसह नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईचा यावेळी निषेध करण्यात आला. ‌‘साम्या कोरडे जिंदाबाद‌’, ‌‘वोट चोर गद्दी छोड‌’, ‌‘संघर्ष आमच्या रक्तात आहे‌’, ‌‘लढेंगे और जीतेंगे‌’ आणि ‌‘क्रांतीचा आवाज बुलंद होणार‌’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दरम्यान, जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा साम्या कोरडे यांनी दिला.
सरकारकडून दडपशाही
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्याची वेळ सरकार आणि प्रशासनावर का आली, याचा त्यांनी विचार करावा. अन्यायाविरोधात बोलायचे नाही का? आंदोलनकर्त्यांना फोन करून त्यांच्यावर नजर ठेवण्यापलीकडे पोलिसांना दुसरे काम उरले नाही का? असे प्रश्न उपस्थित करत कोरडे यांनी सरकारच्या दडपशाहीवर टीका केली. दिल्लीत आंदोलन सुरू असेपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रातील आंदोलनही सुरू राहील. राजीनामा होईपर्यंत माघार घेणार नाही, असा पुनरुच्चार करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
पोलिसांकडून नोटिसांचा धाक
आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करणे, त्यांना फोन करून आंदोलनात जाणार का, अशी विचारणा करणे आणि नोटिसांची भीती दाखवणे, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप ॲड. साम्या कोरडे यांनी केला. विद्यार्थ्यांवर पाळत ठेवून त्यांच्या आवाजावर बंदी घालण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना रोखण्याऐवजी सरकारने त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावे. पोलिसी दबावाने आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला
दादागिरी, हुकूमशाही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही!
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. सर्व आंदोलकांची सुटका होत नाही, तोपर्यंत ठाण्यातून उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची सुटका केली. या प्रकारानंतर शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.आंदोलनासाठी आलेल्या तरुण-तरुणी आणि विद्यार्थ्यांची धरपकड केली जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत नेऊन त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही पोलिसांसाठी भांडतो, त्यांच्या घरांसाठी लढतो. मुंबई पोलिसांचे आम्हाला कायम सहकार्य मिळाले आहे; मात्र, ऑगस्ट क्रांती मैदान आणि शिवाजी पार्क येथील आंदोलनांदरम्यान पोलिसांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. महिला आंदोलकांनाही उचलून नेण्यात आले. एका महिलेची साडी फाटली. हे काय चालले आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आंदोलकांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत नेण्याच्या प्रकारावरही त्यांनी आक्षेप घेतला. कोणाला घाटकोपरला, कोणाला वरळीला, तर कोणाला डोंगरी पोलीस ठाण्यात नेले जात असल्याचे सांगत, नागरिकांवर ही दडपशाही कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला. ही दडपशाही देशातील नागरिकांवर सुरू आहे. महाराष्ट्रात आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. दादागिरी आणि हुकूमशाही खपवून घेणार नाही. आम्ही लढत राहू, पण शांत बसणार नाही, असा ठाम इशाराआदित्य ठाकरे यांनी दिला.
Exit mobile version