शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थचे हस्तांतरण
| उरण | वार्ताहर |
जेएनपीएने जे.एम. बक्षी पोर्ट्स अॅण्ड लॉजिस्टिक लिमिटेड सोबत शॅलो वॉटर बर्थचे अपग्रेडेशन सुसज्जीकरण आणि ऑपरेशन व देखभाल करण्यासाठी, तसेच कोस्टल बर्थ पीपीपी मॉडेलवर चालविण्यासाठी सवलत करारावर स्वाक्षरी केली. आता जेएनपीए हे भारतातील पहिले 100% लँडलॉर्ड असणारे बंदर बनले आहे. शॅलो वॉटर बर्थचे नूतनीकरण आणि कोस्टल बर्थचे व्यवस्थापन व संचालन जे.एम. बक्षी ग्रुपने स्थापन केलेल्या न्हावा शेवा डिस्ट्रिब्युशन टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एसपीव्ही द्वारे केले जाईल.
यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यावेळी जे.एम. बक्षी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कृष्ण कोटक आणि जेएनपीएचे सर्व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते.
शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थ आता पीपीपी टर्मिनल असतील, यासाठी जेएम बक्षी ग्रुपने यशस्वी बोली लावली होती. सवलतधारकाने हे टर्मिनल अपग्रेड करणे, सुसज्ज करणे, ऑपरेट करणे, देखभाल करणे आणि 30 वर्षांच्या कराराच्या कालावधीच्या शेवटी हस्तांतरित करणे आवश्यक आहे. टर्मिनल 3 वर्षांच्या एकाच टप्प्यात विकसित केले जाईल. जेएनपीए द्वारा पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल.
संजय सेठी
जेएनपीएचे अध्यक्ष
आज जगातील अनेक प्रमुख बंदरे ही लँडलॉर्ड असून फक्त विपणन कार्य करीत आहेत. जेएनपीए सुद्धा आता अधिक सुव्यवस्थित पद्धतीने विपणन कार्य हाती घेणार आहे, प्राधिकरणाने सामान्य बंदर व्यवसायाचा विकास केला आहे. जेएनपीए ने किनारपट्टीवरील मालवाहतूकीस चालना एक समर्पित बर्थ प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून कोस्टल बर्थ विकसित केले आहे. किनारपट्टी भागात मालवाहतुकीला चालना देण्यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या ‘सागरमाला’ कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पास अंशतः निधी देण्यात आला होता. कोस्टल बर्थमुळे हरित चॅनेलद्वारे मालवाहतूक सुरळीत आणि जलद होण्यास मदत होईल आणि देशांतर्गत मालवाहतुकीमध्ये किनारी मालवाहतूकीचा वाटा वाढविण्यात मदत होईल, असा दावा जेएनपीए व्यवस्थापनाने केला आहे.
पोलाद, सिमेंट, कंटेनर, खते, अन्नधान्ये आणि काही इतर स्वच्छ कार्गो यांसारख्या प्रतिवर्षी सुमारे 2.8 दशलक्ष मेट्रिक टन कोस्टल कार्गो हाताळण्याची क्षमता कोस्टल बर्थमध्ये आहे. मालाची साठवण आणि हाताळणीसाठी बर्थचे बॅकअप क्षेत्र 9 हेक्टर आहे. प्रकल्पाचा एक भाग म्हणून, जे.एम.बक्षी सिमेंटच्या साठवणुकीसाठी स्वयंचलित मशीनीकृत सिमेंट हाताळणी प्रणाली आणि कनेक्टेड कन्व्हेइंग आणि सायलो सुविधा प्रदान करेल ज्यामुळे जहाज वाहतूक गतिमान व सुगम होईल. नोव्हेंबर 2020 मध्ये पूर्ण झालेल्या कोस्टल बर्थचे उद्दिष्ट किनारपट्टीवरील मालवाहतूकीसाठी उत्तम पायाभूत सुविधा प्रदान करणे आणि रेल्वे व रस्ते मार्गावरील वाहतूकीचा भार कमी करणे, तसेच किफायतशीर स्पर्धात्मक आणि प्रभावी मल्टी-मॉडल वाहतूक उपाय सुनिश्चित करणे हे आहे. असेही सुचित करण्यात आलेले आहे.