12 नोव्हेंबर रोजी उरण पोलीस ठाण्यावर मोर्चा
| उरण | प्रतिनिधी |
महेश रतनलाल बालदी यांनी आगरी समाजाबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी त्यांचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी मंगळवारी (दि. 12) उरण पोलीस ठाण्यात आगरी समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सुधाकर पाटील यांनी दिली.
उरण विधानसभा क्षेत्रात भाजपातर्फे निवडणूक लढविणारे उमेदवार महेश रतनलाल बालदी हे आगरी समाजाबद्दल वारंवार अवमानकारक शब्दप्रयोग करत आहेत. मागच्या विधानसभा निवडणूक काळातही त्यांनी आगरी समाजातील महिलांबद्दल अनुद्गार काढले होते. दि. 29 ऑक्टोबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्यांनी आगरी समाजाबद्दल पुन्हा एकदा हेटाळणीयुक्त आणि अवमान करणारे शब्दप्रयोग केले आहेत. लोकनेते दि.बा. पाटील हे आगरी समाजाचे तसेच भूमीपुत्र आणि कष्टकर्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळास लागावे यासाठीचा ठराव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. सदर सभेत महेश बालदी यांनी हेतुपुरस्सर विमानतळाच्या उल्लेख अदानी विमानतळ असा करून लोकनेते दि.बा. साहेबांचाही अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समाजात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्याची दखल घेऊन आगरी समाजाची शिखर संस्था असलेल्या ‘अखिल आगरी समाज परिषदेने’ दि. 1 नोव्हेंबर रोजी सदर महेश बालदी यांना निषेधाचे पत्र लिहून त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु, महेश बालदी यांनी आजपर्यंत समाजाची माफी मागितल्याचे दिसून येत नाही. वरील पार्श्वभूमीवर महेश बालदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांनी आगरी समाजाची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी आगरी समाजातर्फे दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उरण पोलीस ठाणे येथे मोर्चाचे आयोजन केले आहे. कोटनाका येथील उरण शहर प्रवेशद्वारावर सर्वांनी अगोदर एकत्र यायचे आहे. नंतर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढायचे आहे, असे यावेळी सुधाकर पाटील यांनी कळविले आहे. तरी सर्वांनी या मोर्चात आपल्या सहकार्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा आगरी नेते सुधाकर पाटील यांनी केले आहे.