| रोहा | प्रतिनिधी |
हा देश शेतीप्रधान आहे. शेतकरी समृद्ध झाला तर आधी गाव मग देश समृद्ध होईल. त्यातून आम्हालाही मार्गदर्शन मिळत जाईल. शेती व निसर्गाशी एकरूप होण्याचे हे कार्य आहे. शेतीची आवड निर्माण करत तरुणांना दिशा देणारी बळीराजा फाऊंडेशन ही संस्था आहे. कृषी दिनदर्शिका प्रकाशन करताना मनस्वी आनंद होत आहे, असे मत रोहा अष्टमी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी व्यक्त केले. बळीराजा फाऊंडेशनच्या कृषी दिनदर्शिका 2026 प्रकाशन सोहळा शुक्रवारी (दि.26) पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. रोहा येथील शासकीय विश्रामगृहात नगराध्यक्षा वनश्री शेडगे, तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते दिनदर्शीकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी महादेव करे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले, सिटी ऑफ फ्लॉवर्सचे सुरेंद्र निंबाळकर, नगरसेवक रोशन चाफेकर, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, सचिव ॲड दीपक भगत, रविंद्र कान्हेकर व मान्यवर उपस्थित होते.






