रानडुकरांमुळे शेतीचे नुकसान; भरपाई मात्र नाही

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील शेतकर्‍यांना गेल्या 10-15 दिवसांत वेळीअवेळी पडणार्‍या पावसामुळे उभे पिक आडवे झालेले दिसून आले तर काही भागांमध्ये 25-30 रानडुक्करांच्या कळपामुळे भातशेतीची नासधूस मोठया प्रमाणावर झालेली दिसून आली. यामुळे रानडुक्करांनी शेती फस्त केल्यास सरकारी मोबदला आणि शेतकर्‍यांनी शेती फस्त करणारी रानडुक्करं फस्त केल्यास वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन होईल अथवा कसे, याबाबत कायदा काय म्हणतो, याचा आढावा घेतला असता वनविभागाच्या अधिकार्‍यांची मानसिकता आणि प्रत्यक्ष कायदा यांच्यातील तफावत निदर्शनास येत आहे.

शेतकर्‍यांना त्यांचे हातातोंडाशी आलेले पिक वाचविण्याकरीता अशा टोळीने झुंडीने फिरणार्‍या वन्यजीवांच्या हत्येचा अर्थात कृषीक्षेत्र अथवा लोकवस्तीमध्ये वावर सुरू झाल्यास शिकारीचा आणि शिकार केल्यानंतर ते वन्यजीवांचे मांस भक्षण करण्याचा अधिकार शेतकर्‍यांना असायला हवा अशी एक विचारधारा सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, याच विचारधारेमुळे वनअधिकारी हे शेतकर्‍यांविरूध्द कारवाई करून त्रास देत असल्याचे प्रसंग जाणवत आहेत.

दरम्यान, शेतकर्‍यांचे पीक नासाडी करणार्‍या रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी क्षेत्रातील उपद्रवी वन्यजीवांच्या शिकारीसाठी शेतकरीवर्गाने मागणी केली आहे. शिवाय शिकारीनंतर वन्यजीवांचे मांस भक्षण करण्यायोग्य असल्यास तशी कृती केल्यास त्यास कायदेशीर मुभा नैसर्गिक न्यायतत्वाने देण्यात यावी, अशी न्याय्य मागणी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करणार असल्याचे राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार शैलेश पालकर यांनी सांगितले.

Exit mobile version