| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग व अलिबाग पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पत्रिकादेखील तयार करण्यात आली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, वसंतराव नाईक यांच्या नावाचा विसर कृषी विभागाला पडला. पत्रिकेमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेखच नसल्याचे दिसून आले.
दिवंगत वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विविध कृषी धोरणे राबविली होती. शेतकरी आणि शेतीच्या प्रगतीसाठी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे एक जुलै हा दिवस हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पाळला जातो. यानिमित्त राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. बुधवारी (दि.1) जुलैला कृषी दिन आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस रायगड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविला जाणार आहे.
रायगड जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व अलिबाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याची तयारीदेखील करण्यात आली आहे. त्यासाठी आमंत्रण पत्रिका छापण्यात आली आहेत. मात्र, या पत्रिकेत नाईक यांच्या नावाचा साधा उल्लेखही नसल्याचे दिसून आले आहे. कृषी विभागाला वसंतराव नाईक यांच्या नावाचा विसर पडल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
कृषी विभागाला वसंतराव नाईकांचा विसर
