। पेण । वार्ताहर ।
भोगावती नदीमध्ये केलेला अतिक्रमण आणि भरावाबाबत महसूल यंत्रणेला जाग आली असून,त्या भरावाचे मोजणीचे आदेश देण्यात आले आहेत. या भरावाबाबत दै.कृषीवलमध्ये 22 मे रोजी कुंपणच शेत खातंय तर दाद कुणाकडे मागायच या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महसूल खात्याच्या काही अधिकार्यांना जोरदार चपराक बसली. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून अधिकारी वर्गाने धावाधाव सुरु केली परंतु वरिष्ठांच्या नजरेतून प्रसिध्द झालेले वृत्त सुटले नाही. वरिष्ठांनी तातडीने संबंधित अधिकारी वर्गाला विचारपूस करीत लगेचच भोगावती नदीमध्ये झालेल्या बांधकामांचे व भरावाचे मोजमाप घेण्याचे आदेश दिले.
भोगावती नदीच्या दोन्ही तीरावर असणार्या जमिनींचा विचार करता काही जमिनींना ग्रीन झोन तर काही ठिकाणी नॉन डेव्हलपिंग झोन असे असताना भूमाफिया सर्वसामान्यांची फसवणूक देखील करत आहेत, बेधडक नदीपात्रात भराव टाकून दगडांची पिचिंग करुन जागा वाढवून त्याचे तुकडे करुन विकत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या कामी काही महसूल कर्मचार्यांचे हात देखील असल्याचे बोलले जात आहे. मात्र नदी पात्रातील होणार्या बांधकामा संदर्भात वृत्त प्रसिध्द होताच अनेकांनी कृषीवलचे देखील आभार मानले
नदीमध्ये भराव करणार्या विरुध्द ठोस कारवाई केली जाईल. तसचे मी तलाठी व मंडळ अधिकार्यांना तातडीने नदीमधील बांधकामाचे मोजमाप घ्यायला सांगितले आहे. गुरुवारी त्यांचा रिपोर्ट आल्यावर नदीत बांधकाम करणार्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. व जे कोणी दोषी असतील त्यांची नावे प्रसार माध्यमाला दिली जातील.
– विठ्ठल इनामदार, प्रांत अधिकारी
सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता
भोगावती नदीच्या पात्राच्या दोन्ही अंगास सुरु असणार्या प्लॉटींग या कायदेशीर नसून बेकायदेशीर आहेत. कारण बर्याचशा जमिनींना ग्रीन झोन व नॉन डेव्हलपिंग झोन असल्याने या ठिकाणी जमिनीचे तुकडे विकत घेतल्यास भविष्यात बांधकाम करता येणार नाही. तरी ज्या कुणाला जमिनीचे तुकडे विकत घ्यायचे असतील त्यांनी सर्व कागदी दस्तावेज तपासूनच घ्यावेत अन्यथा सर्वसामान्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.