शेती ही जगाला तारणारी यंत्रणा

टी.एस. देशमुख यांचे प्रतिपादन

| नेरळ | प्रतिनिधी |

शेती जगली तर जग जगेल आणि जगाला अन्नधान्य देण्यासाठी शेतकरी जगला पाहिजे, टिकला पाहिजे यासाठी किसान क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे . असे प्रतिपादन किसान क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष टी.एस. देशमुख यांनी केले. कर्जत येथे जागतिक शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशमुख बोलत होते.

कर्जत तालुका किसान क्रांती संघटना आणि किसान फाऊंडेशन यांच्या माध्यमातून दि. 23 डिसेंबर रोजी जागतिक शेतकरी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष टी.एस. देशमुख, श्रीधर जांजिरकर, जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके आणि तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रगत शेतकरी नीलिकेश दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पाटील, किसान क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष सुभाष चौधरी, सचिव राजेंद्र जैतपाल, संपर्क प्रमुख सुरेश म्हस्के, रियाज बंदरकर, संघटक विनायक देशमुख, प्रकाश कांबेरे आदी प्रमुख तसेच कर्जत तालुका कार्यकारिणी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किसान क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत राणे, तालुका उपाध्यक्ष शरद तवळे, सचिव एकनाथ शेळके, अरुण शेळके, खजिनदार रवींद्र जाधव, प्रवक्ते सुरेश खानविलकर, महिला तालुका अध्यक्षा रुपाली राणे, स्थानिक ग्रामपंचायत माजी उप सरपंच दीपक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील प्रगतशील अशा 100 शेतकरी दाम्पत्यांचा साडीचोळी तसेच शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शिरसे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने तर शाहीर पैठण सातारा येथील अर्णवी काटकर, श्रेया काटकर यांनी पोवाडा सादर करून कार्यक्रमाला रंगत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाई खानविलकर, तर सूत्रसंचालन शरद तवले, एकनाथ शेळके यांनी केले.

संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके यांनी शेतीमध्ये योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करणे आणि नंतर त्या माध्यमातून तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे हाच किसान क्रांती संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी किसान क्रांती संघटनेचे कर्जत तालुका कार्यकारिणी तसेच महिला कार्यकारिणी यांचे मोठे योगदान राहिले. त्यात शोभा देशमुख, अस्मिता राणे, सुगंधा शेळके, सुवर्णा देशमुख, रचना गवळे, सुरेखा आसवले, सविता धुळे, विद्या मोधले तसेच कृष्णा सोनावळे, मोरेश्वर भगत, रामदास माळी यांचा सहभाग होता.

जगामध्ये अनेक सोंगे आणता येतील, पण अन्नधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदान जग कधीही विसरू शकत नाही. शेती ही जगाला तारणारी आहे, त्यामुळे रक्ताचा थेंब आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढत राहणार.

-टी.एस. देशमुख, संस्थापक-अध्यक्ष, किसान क्रांती संघटना


तालुक्यातील शेतकरी हे कृषी विभाग कार्यालयात येऊन मार्गदर्शन घेण्यासाठी आणि योजना राबविण्यासाठी येत असतात. त्यांच्या प्रयत्नांबद्दल तालुक्यात काम करताना आनंद मिळतो. प्रगतीशील आणि वेगळी शेती करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल कौतुक वाटते. आमचे कार्यालय आणि आमची यंत्रणा या सर्व शेतकऱ्यांमुळे धावू लागली आहे.

अशोक गायकवाड, तालुका कृषी अधिकारी


Exit mobile version