‌महाडमध्ये ‌‘कृषि दिंडी’ उत्साहात

कृषी महाविद्यालयाच्यावतीने कृषी दिन साजरा

| महाड | प्रतिनिधी |

हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ संलग्न महाडमधील कृषी महाविद्यालयाच्यावतीने “कृषि दिंडी”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “जपुया माती, पिकवूया मोती” या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले होते.

या दिंडीचा शुभारंभ सकाळी साडेसात वाजता महाड शहरातील ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज मंदिरातून शेकडो विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी निसर्ग संवर्धन, सेंद्रिय शेती व जलसंधारणाचे संदेश देणारे फलक व घोषणा देत ही दिंडी बाजारपेठ, बस स्थानक चौक, माता जिजाऊ उद्यान मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे छत्रपती शिवाजी महाराज व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, माती परीक्षण व पाणी परीक्षण या विषयांवर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार महेश शितोळे हे उपस्थित होते. ते यावेळी बोलताना म्हणाले की, “कृषी दिन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा गौरव दिन आहे. महाडसारख्या क्रांतीभूमीतून शेतीच्या नव्या क्रांतीची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे. कृषी महाविद्यालयाचा हा उपक्रम रायगड जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल,” असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख उपस्थिती महाड मंडळ कृषी अधिकारी लांडगे, वनक्षेत्रपाल भोसले, नगरसेवक प्रमोद महाडिक, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव गिम्हवणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव कोकाटे, प्रा. जगन्नाथ मोरे, प्रा.डॉ. विशाल बिरवटकर, प्रा. सविता यादव, प्रा. डॉ. राहुल डुंबरे, राजेंद्र जैतपाल, डॉ. रायकर, प्रा. प्रियंका तडकसे, प्रा. हेडाव, प्रा. मयुरी मोरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.जी. चिमणकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक आणि महाडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले. त्यानंतर दिंडी श्रीराम मंदिर मार्गे ऐतिहासिक चवदार तळ्यावर पोहोचली. तेथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून सहभागी नागरिकांना मोफत वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाचा समारोप झाला. दरवर्षी कृषी महाविद्यालयातर्फे हा उपक्रम राबविला जात असून, यंदा त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

सामाजिक ऋणनिर्देश सोहळा
1 जुलै पासून रोटरी इंटरनॅशनल व लायन्स क्लब्स इंटरनॅशनल या सेवाभावी आंतरराष्ट्रीय संस्थांचे नवीन वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटे. सुधीर मांडवकर, रोटे. जॉन्सन डिसोझा, रोटे. संतोष नगरकर, रोटे. चेतन पलांडे व लायन स्नेहा बुटाला या मान्यवरांचा सन्मानचिन्ह व वृक्ष रोप देऊन गौरव करण्यात आला.
Exit mobile version