शेती, पाऊस आणि दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन

| पाली | वार्ताहर |

6 ऑगस्ट रोजी सुधागड तालुका तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा अंतर्गत शेती, पाऊस आणि दाखले कार्यक्रमाचे आयोजन सुधागड तालुका कृषी कार्यालय व महसूल विभागाच्या संयुक्तरीत्या करण्यात आले होते. कार्यक्रमात कृषी व महसूल विभागाच्यावतीने शेतकरी बांधवांसाठी पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घराचे, शेतीचे, फळबागांचे तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्याकरीता उपस्थित शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सातबारा व 8 अ च्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.

तसेच आपत्ती व्यवस्थापक अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार बाधित नागरिक भिकू नारायण महाले रा. वावळोली शेळी संदर्भात चार हजार रुपये मदत देण्यात आली. रमेश रामाजी आखाडे रा. वासुंडे म्हैस संदर्भात नुकसान भरपाई 37 हजार 500 रूपये देण्यात आली. तसेच हेमा पांडू वारगुडे रा. करंजई यांना 37 हजार 500 रुपये देण्यात आली. या सर्व रक्कमेचे वाटप आर्थिक मदतीचे धनादेशाद्वारे करण्यात आले. सदर कार्यक्रम कृषी विभाग व महसूल विभागाने राबवला. सदर कार्यक्रमात महसूल प्रशासनाच्यावतीने सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार, निवासी नायब तहसीलदार फुलपगारे, महसूल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे, निवडणूक नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी, कृषी विभागामार्फत कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक उपस्थित होते.

शेती, पाऊस याबाबत काही नुकसान झाल्यास तहसील कार्यालय व कृषी कार्यालय यांच्याशी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांच्यासह तालुका कृषी अधिकारी यांनी केले.

Exit mobile version