शेती पाण्याखाली; बळीराजा चिंताग्रस्त

| नेरळ | प्रतिनिधी |
सप्टेंबर अखेरपर्यंत कोसळणारा पाऊस आता ऑक्टोबरपर्यंत लांबला आहे. त्या पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ केली आहे. परतीच्या पावसाने भाताची पिकांनी बहरलेली शेते पाण्याने भरली आहेत. त्यामुळे भातपीक खराब होण्याची शक्यता असून, बळीराजा चिंतेत सापडला आहे. कर्जत तालुक्यात साधारण 9000 हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. पावसाळ्यात भात हे येथील जनतेचे मुख्य पीक असून, अनेक शेतकर्‍यांचा शेती हा प्रमुख व्यवसायदेखील आहे. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाचा कालावधी बदलत असून, त्याचा फटका दरवर्षी शेतकरी वर्गाला बसत आहे. सप्टेंबरअखेर संपणारा पावसाळा आता ऑक्टोबरपर्यंत लांबला असून, त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.


मागील 15 दिवस परतीच्या पावसाने सतत वर्षाव सुरू ठेवला असल्याने भाताची शेती धोक्यात आली आहे. साधारण दसर्‍यानंतर भाताची कापणी सुरू होते आणि दिवाळी म्हणजे आगोटपूर्वी भाताची मळणी पूर्ण होत असते. हे चक्र मागील काही वर्षात बदलले असून, पावसाचा बेभारशीपणा यामुळे भाताची शेतात दिवाळी तोंडावर आली तरी पिके तशीच उभी आहेत तर काही ठिकाणी पिके शेतात कोसळून पडली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

परतीचा पाऊस अजूनही सुरू असल्याने भाताची शेते सध्या पाण्याने भरून राहिली आहेत. त्याचा परिणाम यावर्षी दिवाळी आधी पाऊस गेला नाही तर आमच्या हाती भाताचे पीक येण्याची शक्यता फार कमी आहे.

– अंकुश शेळके, शेतकरी, कुंभे
Exit mobile version