श्रीवर्धन तालुक्यात वारंवार इंटरनेट सेवा खंडित
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात या कारणाने ॲग्रीस्टॅक योजनेची सुरुवात झाली. ही योजना केंद्र व राज्य शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षात सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जाणार आहेत. मात्र, काही कारणांनी श्रीवर्धन तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजना रखडल्याचे निदर्शनास येत आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढल्याशिवाय कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजनेबद्दल कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी यांनी गावागावात या कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा आणि आठ अ कागदपत्रे, सोबत आपला भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्डशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली.
तसेच, शासकीय कर्मचारी घरोघरी जात लॅपटॉपच्या सहाय्याने ॲग्रीस्टॅक नोंदणी, शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्डला लिंक केले असल्यास भ्रमणध्वनीवर ओटिपी पाठवणे या प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून करताना दिसतात. परंतु, श्रीवर्धन तालुक्यात इंटरनेट सेवा वारंवार खंडित होणे तर अनेक दुर्गम व डोंगराळ भागात इंटरनेट सेवा पोहोचली नाही. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक आधार कार्डला लिंक केलेले नाहीत. तर बहुतांश शेतकऱ्यांनी आधार कार्ड नुतनीकरण केलेले नाही. या कारणास्तव श्रीवर्धन तालुक्यात ॲग्रीस्टॅक योजना रखडली आहे.
योजनेचे फायदे
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो आणि त्यांना पीक विमा, पीक कर्ज, आणि इतर अनुदाने थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्यास मदत होते. ही प्रणाली शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि समृद्ध बनवते, ज्यामुळे शेती क्षेत्रातील डिजिटल क्रांतीला चालना मिळते.







