उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एड्स या आजारावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच हा आजार होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाने जनजागृती सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबागमार्फत अलिबागमध्ये बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीतून एड्सविषयी जनजागृती करण्यात आली. दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अलिबाग येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अलिबाग समुद्रकिनारा कमानी परिसरातून रॅलीला सुरुवात करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक कॉलेज व नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला. महावीर चौक छ. शिवाजी पुतळा बालाजी नाका मारूती रोड मार्गे ही रॅली पुन्हा समुद्रकिनारी दाखल झाली.
दरम्यान आयसीटीसी इंटेंसिफाइड आयईसी कॅम्पेनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक: उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील समुपदेशक महेश गोसावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगेश पाटील, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक उपजिल्हा रुग्णालय माणगाव मधील समुपदेशक प्रिया निवाते, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरती राजपूत तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिल्हा रुग्णालय अलिबाग आयसीटीसी एक, समुपदेशक अर्चना जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, डीएसआरसी समुपदेशक अश्विनी कदम, मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिश नाईक, क्लिनर रुपेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. लोकपरिषद पनवेल, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट पेण, आधार ट्रस्ट पनवेल या स्वयंसेवी संस्थांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. इंडेक्स टेस्टिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल रिलायन्स हॉस्पिटल, लोधिवलीचा गौरव करण्यात आला.बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकारी, हेमकांत सोनार, आयसीटीसी समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग ऑफिसर व एनजीओ प्रतिनिधींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रश्मी सुंकले यांनी केले.







