। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवल्यानंतर यंदा एक पाऊल पुढे जात सोनेरी यश मिळवण्याचे ध्येय भारताची आघाडीपटू बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बाळगले आहे. 26 जुलैपासून सुरू होणार्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा सिंधूला विश्वास आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा यांनाच वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांतील यशानंतर सिंधूला आता ऑलिम्पिकमधील भारताची पहिली महिला सुवर्णपदक विजेती म्हणून इतिहास घडवण्याची संधी आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी उत्सुक असून त्या दृष्टीनेच तयारी करत असल्याचे सिंधूने सांगितले.
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक कारकीर्दीतील तिसरे पदक मिळवण्यासाठी मी उत्सुक आहे. यंदा सुवर्णपदकाचेच माझे ध्येय आहे. अन्य स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये खूप फरक आहे. ऑलिम्पिकला वेगळेच महत्त्व आहे आणि या स्पर्धेत नेहमीच माझे 200 टक्के देऊन खेळते,असे सिंधू म्हणाली. 2016 आणि 2020 च्या स्पर्धेमध्ये पदकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. पॅरिस येथे होणारी स्पर्धाही याला अपवाद ठरणार नाही. नव्या जोमाने या स्पर्धेत उतरेन आणि काहीही झाले तरी 100 टक्के देऊनच खेळेन, असा विश्वास सिंधूने व्यक्त केला.