जिल्ह्यातील 400हून अधिक फेऱ्या रद्द
| अलिबाग | प्रमोद जाधव |
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातून 226 एसटी बसेस मुंबई, ठाणे येथे पाठविण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील 400 हून अधिक एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, दि. 23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत 17 हजार किलोमीटरच्या प्रवासाला ब्रेक लागला. त्याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्यांवर झाला. ऐन सणासुदीत ग्रामीण वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले.
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या अखत्यारित अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, माणगाव, महाड, मुरूड, श्रीवर्धन असे आठ एसटी बस आगार आहेत. या आगारात 470 हून अधिक एसटी बसेस आहेत. जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यात दीड हजार चालक व वाहकांचा समावेश आहे. एसटीतून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी एक जीवनवाहिनी ठरत आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांना एसटी बसचा कायमच उपयोग होतो.
जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. बुधवारी (दि.27) बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे. त्यानिमित्ताने अलिबागसह अन्य तालुका व जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जाण्याची लगबग गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. परंतु, खरेदीसह नोकरी, शिक्षण, दैनंदिन कामासाठी एसटीने जाणाऱ्या भक्तांसह विद्यार्थी, कामगारांचे तीन दिवस प्रचंड हाल झाले.
मुंबई व ठाणे येथे नोकरी व्यवसायानिमित्त असणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातून 226 एसटी बसेस पाठविण्यात आल्या. 23 ऑगस्टपासून या बसेस ठाणे व मुंबईत पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्याचा फटका अन्य प्रवाशांसह खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या भक्तांना बसला. ग्रामीण भागात जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागामध्ये ठराविकच बसेस पाठविल्या जातात. त्यात सणासुदीत फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.23 ऑगस्ट रोजी पाच हजार 265 किलोमीटर, 24 ऑगस्ट रोजी सहा हजार 63 व 25 ऑगस्ट रोजी सहा हजार 149 किलोमीटर अशा तीन दिवसांमध्ये 17 हजार 477 किलोमीटरच्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला.
चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातून 226 एसटी बसेस पाठविण्यात आल्या होत्या. अपुऱ्या बसेसमुळे काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
दिपक घोडे,
विभाग नियंत्रक, रायगड
गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी बसची अपेक्षा होती. मात्र, 23 ऑगस्टपासून तीन दिवस ग्रामीण भागातील बसफेऱ्या रद्द केल्याने त्याचा फटका शाळा, महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नियमित प्रवास करणाऱ्या आम्हा प्रवाशांना झाला. त्यामुळे बसस्थानकात तासन्तास ताटकळत बसावे लागले.
साक्षी जाधव,
प्रवासी







