ग्रामसभेत ग्रामस्थांना खोटी आश्वासने; ग्रामस्थ सर्वपक्षीय मोर्चाच्या पावित्र्यात
। अलिबाग । विशेष प्रतिनीधी
खोट्या भुलथापा देऊन खुर्चीवर आलेल्या बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांना थळमधील पाणीप्रश्न सोडवता आला नसल्याने त्यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. गणेशोत्सवापूर्वी झालेल्या ग्रामसभेत आपल्याकडे भरपूर निधी असल्याचा आमदारांचा दावा पोकळच असल्याचे यावरुन स्पष्ट झाले असून गणपतीसाठी मुंबई, ठाण्याहून थळमध्ये आलेल्या ग्रामस्थांमध्ये देखील प्रचंड संताप पसरला आहे. ऐन सणासुदीमध्ये टँकरनेच पाणी घ्यावे लागत असल्याने खोटारड्या आमदार आणि ग्रामपंचायतीविरोधात पुन्हा एकदा सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बंडखोर आ.महेंद्र दळवी यांच्या थळमधील बाजार, कोळीवाडा परिसरात गेले अनेक महिने पाणी येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या विभागातील नागरिक पाणी टंचाईने हैराण झाले आहेत. या गावाला ग्रामपंचायतीच्या गलथानपणामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावरुन आमदारांनी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने खोटी असल्याचे समोर आले आहे.निवडणुकीपूर्वी बंडखोर आमदारांनी गावच्या विकासाचा आराखडा सांगितला होता. रस्ते, पाणी या बरोबरच गावाचा सर्वांगीण विकास कसा होणार, याबद्दल ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण केला. मोठमोठी स्वप्नं दाखविली. मात्र प्रत्यक्षात गावाचा विकास करण्यात आमदार सपशेल फोल ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्वातंत्र्यदिनी झालेल्या थळ ग्रामपंचायतीची ग्रामसभेत आमदार दळवी यांनी पाणी प्रश्नाबाबत आपल्याकडे भरपूर निधी आहे, तुम्ही फक्त कामं सांगा, असा बडेजाव केला होता. मात्र ऐन गणेशोत्सवातही ग्रामस्थांना पाणी पुरवठा करु न शकलेल्या बंडखोर आमदारांनी केलेली फसवणूक ग्रामस्थांच्या लक्षात आली आहे.
थळ बाजार, कोळीवाड्यातील पाणीप्रश्न कित्येक महिन्यांपासून कायम असताना आणि आमदारांकडे भरपूर निधी असताना राहत्या गावातील प्रश्न मार्गी लावू शकत नाही ते मतदारसंघाचे प्रश्न काय सोडवणार, असा प्रश्न थळ ग्रामस्थ शिरिष राजके, मुबीन साखरकर यांनी उपस्थित केला आहे.
चाकरमान्यांच्या संतापाचा उद्रेक
पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करणार्या थळ ग्रामस्थांना गणपतीमध्ये देखील टँकरनेच पाणी आणावे लागले आहे. त्यामुळे आमदारांनी दिलेली आश्वासने खोटी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आपली फसवणूक होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गावात कसलाही विकास होत नसल्याने मतदारसंघात काय कामे करणार, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. गौरीगणपतीसाठी मुंबई, ठाण्याहून गावात आलेले चाकरमानी लोकलोकप्रतिनिधींच्या नावाने लाखोल्या वाहत आहेत.