दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर
| सांगली | प्रतिनिधी |
बोंबाळेवाडी-शाळगाव (ता. कडेगाव) येथील एमआयडीसीतील एका कंपनीत शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वायुगळती झाली. त्यामुळे एमआयडीसी परिसर आणि शेजारच्या वस्त्यांवर विषारी वायू पसरला. त्यामुळे कंपनीतील चार कामगार आणि शेजारच्या वस्तीतील सहा नागरिक अशा एकूण 10 जणांना बाधा झाली. रात्री उशिरा एका महिलेसह आणखी एक जणाचा मृत्यू झाल्याचे समजते. बोंबाळेवाडी-शाळगाव येथे खतनिर्मितीची कंपनी आहे. कंपनीत अचानक वायुगळती झाली. गळतीमुळे कर्मचार्यांसोबतच परिसरातील नागरिकांनाही त्रास होऊ लागला. घटनेची माहिती मिळताच, कडेगावचे तहसीलदार अजित शेलार आणि पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या; परंतु गळती झालेला वायू कोणता होता, याबाबत माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
गळतीमुळे बोंबाळेवाडी, रायगाव आणि शाळगाव परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांत जळजळ आणि उलट्यांचा त्रास झाला. त्यांना तात्काळ कर्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या दुर्घटनेमुळे बोंबाळेवाडी, शाळगाव व रायगाव येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेची चौकशीची होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.