तळोजा एमआयडीसीत वायूप्रदूषण

। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा एमआयडीसीत रात्रीच्या वेळी सोडणार्‍या रसायनांच्या उग्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोमवारी (दि.29) पहाटेदेखील अशाच उग्र वासामुळे नागरिकांची झोप उडाली होती. त्यामुळे प्रदूषण महामंडळाने केमिकल सोडणार्‍या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात तळोजा रासायनिक औद्योगिक क्षेत्रातून सोमवारी पहाटे उग्र वासाच्या त्रासामुळे अनेकांची झोप उडाली. पोटात मळमळ, चक्कर, श्‍वास घेण्यास अडथळा जाणवत असून या उग्र वासामुळे गणेशोत्सवात आजारी पडण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

उग्र वासामुळे श्‍वास घेण्यास अडथळे निर्माण होत असल्यामुळे बहुतांश नागरिक सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी गेले नाहीत. तळोजा एमआयडीसीमधून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणार्‍या केमिकलची मोजणी करण्यासाठी प्रदूषण मोजमाप करणारे यंत्र बसवावे. आठवड्यातून किमान एक वेळ रात्री पसरणारे उग्र वास तपासण्यासाठी पथक पाठवावे. यासाठी तळोजा आणि खारघरमधील नागरिकांनी राज्य प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयावर आंदोलन केले. तसेच पत्रव्यवहार करूनही त्याकडे प्रदूषण महामंडळाकडून दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ तळोजा विभागाचे विभागीय अधिकारी सचिन आरकड यांना फोन केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Exit mobile version