विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर

। पनवेल । प्रतिनिधी ।

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिर पनवेल मधील व्ही.के. हायस्कूल येथे 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना सुनील गायकवाड, भूषण खैरे, सर्वेश पाटील, रुद्राश गोवारी, वसीम सर यांनी मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यूसाठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपली कागदपत्रे कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचे स्वरूप काय आहे, कामाची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात, तुमच्या आत्मविश्‍वासावर, बोलण्याच्या कलेवरती आणि शिक्षणावर तुमची निवड होते अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. तसेच, विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केले तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता, असे मान्यवरांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी. आमदार बाळाराम पाटील, जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे, काशिनाथ पाटील, गोपाळ भगत, प्रीती जॉर्ज आणि सारिका भगत, देवा पाटील, बबन विश्‍वकर्मा हे उपस्थित होते.

भविष्यात आपल्या पनवेलमध्ये सुरू होणार्‍या स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात आपल्या विभागातील जास्तीत जास्त तरुण नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम होतील त्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊल आहे. या पुढील भविष्यात अशा प्रकारे विविध शिबीर शेतकरी कामगार पक्ष आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा माझा मानस आहे.

प्रितम जनार्दन म्हात्रे,
अध्यक्ष, जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
Exit mobile version