अजय देवगणने कर्जतमध्ये खरेदी केली दोन एकर जमीन!

सरकारी मूल्यांकनापेक्षा तब्बल 98 लाख रुपये अधिक मोजले; शेतकऱ्याला बाजारभावाचा मोबदला

| नेरळ | प्रतिनिधी |

‌‘सिंघम‌’फेम प्रसिद्ध अभिनेते अजय देवगण यांनी कर्जत तालुक्यातील भोईरवाडी येथील आपल्या देवगण फार्मच्या शेजारील दोन एकर पाच गुंठे शेतजमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी त्यांनी तब्बल एक कोटी 60 लाख रुपये मोजले असून, सरकारी मूल्यांकनापेक्षा सुमारे 98 लाख रुपये अधिक देत शेतकऱ्याला बाजारभावाचा मोबदला दिला आहे.

कर्जत तालुक्यातील निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणामुळे अनेक उद्योजक, चित्रपट अभिनेते आणि खेळाडूंनी येथे फार्महाऊस उभारले आहेत. अजय देवगण यांचे वडील वीरू देवगण यांनी 1990 च्या दशकात भोईरवाडी येथे सुमारे 28 एकर क्षेत्रावर देवगण फार्म उभारला होता. तेव्हापासून देवगण कुटुंबाचे या गावाशी जवळचे नाते आहे. वीरू देवगण यांच्या निधनानंतर अजय देवगण यांच्या आई फार्मची जबाबदारी सांभाळत आहेत.

देवगण फार्मच्या मागील बाजूस असलेली सावेले गावातील एका शेतकऱ्याची जमीन मुंबईतील गुंतवणूकदाराने सुमारे दहा वर्षांपूर्वी खरेदी केली होती. या जमिनीवर शेती केली जात नव्हती. फार्मला लागून असलेली ही जमीन खरेदी करण्याचा निर्णय अजय देवगण यांनी घेतला. कर्जत तालुक्यातील उद्योजक कडू यांच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी हा व्यवहार पूर्ण झाला. या जमिनीचे सरकारी मूल्यांकन एकरी 31 लाख रुपये असताना, अजय देवगण यांनी बाजारभावानुसार अधिक रक्कम देत व्यवहार केला. त्यामुळे देवगण फार्मच्या क्षेत्रात आणखी दोन एकरांची भर पडली आहे.

कर्जत येथील प्रशासकीय भवनात अजय देवगण यांच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीने जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण केला. या जमिनीची नोंद भोईरवाडी तलाठी कार्यालयात सातबारा नोंदीसाठी आल्यानंतर हा व्यवहार समोर आला असून, अंतिम नोंद कडाव येथील महसूल मंडळ अधिकारी कार्यालयात होणार आहे.

Exit mobile version