। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जामनगर राजघराण्याचा पुढील वारस म्हणून माजी क्रिकेटपटू अजय जडेजाची निवड करण्यात आली आहे. जाम साहेब शत्रुशल्य सिंह महाराज यांनी शनिवारी (दि.12) सकाळी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. अजय जडेजाने याआधीच भारतीय क्रिकेटपटू म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. अलीकडेच तो टी-20 विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान संघाने चमकदार कामगिरी केली होती. यावेळी शत्रुशल्यसिंहजी म्हणाले, दसरा हा तो दिवस आहे जेव्हा पांडवांनी 14 वर्षांचा वनवास यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर विजयाचा अनुभव घेतला होता. आज मलाही विजयी झाल्यासारखे वाटत आहे, कारण अजय जडेजाने माझा उत्तराधिकारी आणि नवानगरचा पुढचा जाम साहेब होण्याचे मान्य केले आहे. ज्याला मी खरोखरच मोठा मानतो.
जामनगरच्या राजघराण्याला क्रिकेटचा समृद्ध वारसा आहे. प्रतिष्ठित रणजी करंडक आणि दुलीप करंडक यांना जडेजांचे नातेवाईक केएस रणजीतसिंहजी आणि केएस दुलीपसिंहजी यांचे नाव देण्यात आले आहे. याच कुटुंबातील अजय जडेजाने 1992 ते 2000 पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्यांनी 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामने खेळले आहेत.