अजिंक्य रहाणेचा क्रिकेटशी ब्रेकअप!

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने यावर्षी इंग्लिश काऊंटी लीसेस्टरशी करार केला होता, मात्र कसोटी संघात पुनरागमन झाल्यानंतर तो काऊंटीमध्ये सामील होऊ शकला नाही. काऊंटीला आशा होती की, रहाणे एकदिवसीय चषकसाठी उपलब्ध होईल. पण त्याने एकदिवसीय चषकातून आपले नाव मागे घेतले आहे. अजिंक्य रहाणे जूनमध्ये या काऊंटीमध्ये सामील होणार होता, परंतु त्यादरम्यान तो भारताच्या कसोटी संघात परतला आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळला. यानंतर तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला जेथे भारताने दोन कसोटी मालिका खेळल्या.

क्रिकबझच्या वृत्तानुसार काऊंटीने सांगितले की, रहाणेला काऊंटीसोबत करारबद्ध केले होते, तेव्हा कसोटी चॅम्पियनशिप आणि वेस्ट इंडिज दौरा त्याच्या वेळापत्रकात नव्हता आणि आता रहाणेने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रहाणे यापुढे एकदिवसीय चषकातही या काऊंटीकडून खेळताना दिसणार नाही. रहाणे सुट्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. रहाणे गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून कसोटी संघाबाहेर होता. यादरम्यान त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आणि आयपीएलमध्येही धावांचा पाऊस पाडला. तो आयपीएल-2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. संघाला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात रहाणेचा मोठा वाटा होता.

या सर्व बाबी लक्षात घेऊन निवडकर्त्यांनी त्याला पुन्हा टीम इंडियात संधी दिली. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत रहाणेने चांगली कामगिरी केली पण वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. रहाणेच्या जागी काऊंटीने ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब वनडे चषकात लीसेस्टरशायरकडून खेळणार आहे. तो काउंटी चॅम्पियनशिप आणि टी-20 ब्लास्टमध्ये संघाचा भाग होता आणि एकदिवसीय चषकातही तो संघासोबत राहील.

Exit mobile version