अजिंक्य रहाणे उभारणार जागतिक दर्जाची अकादमी

राज्य सरकारने दिली प्राईम लोकेशनची जागा

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई येथील पॉश वांद्रे परिसरात जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला 2,000 चौरस मीटर जमीन भाडेतत्त्वावर देण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली आहे. 1988 मध्ये महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर ट्रेनिंग अकादमी स्थापन करण्यासाठी हा भूखंड देण्यात आला होता. मात्र, तेथे कोणताही प्रकल्प उभारला नसल्याने ती जमीन गावस्कर यांच्याकडून काढून घेत आता रहाणेला भाडेपट्ट्याने दिली आहे.

सुनील गावसकर यांच्याकडून सरकारने भूखंड का काढून घेतला?
इनडोअर क्रिकेट ट्रेनिंग अकादमी विकसित करण्यासाठी 36 वर्षांपूर्वी गावसकर यांना प्रथम भूखंड वाटप करण्यात आला होता, असे कॅबिनेट नोटमध्ये म्हटले आहे. विकासाअभावी शासनाने हा भूखंड परत माघारी घेतली. झोपडपट्टीतील रहिवासी अयोग्य कारणांसाठी भूखंड वापरत असल्याने हा भूखंड वाईट अवस्थेत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
अजिंक्य रहाणेला तीस वर्षे भाडेतत्त्वावर मिळाली जमीन
अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी क्रिकेटपटू अजिंक्य मधुकर रहाणेला 30 वर्षांच्या लीजवर जमीन देण्याच्या महसूल विभागाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले. हा भूखंड रहाणे यांना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव म्हाडा (महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण) कडून मंजूर करण्यात आला होता, त्याला मंत्री मंडळाच्या परिषदेने मंजुरी दिली. 'सुनील गावसकर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्ट'ला दिलेला हा भूखंड मे 2022 मध्ये राज्य सरकारला परत करण्यात आला होता.
प्राइम लोकेशन असूनही अकादमी बांधली गेली नाही
2021 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी सुनील गावसकर यांनी अकादमीसाठी कोणतेही काम केले नसल्याचा खुलासा केला होता. प्राइम लोकेशन असूनही तिथे चांगली क्रिकेट अकादमी बांधली गेली नाही. गावसकर यांनी भारतासाठी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 10122 आणि 3092 धावा केल्या. दीर्घकाळापर्यंत, कसोटीत सर्वाधिक 34 शतकांचा विक्रम गावसकरांच्या नावावर होता, जो नंतर सचिन तेंडुलकरने मोडला.
Exit mobile version