| मुंबई | प्रतिनिधी |
याचे पाय तोडा, त्याचा कोथळा काढा, गुन्हा दाखल झाला तरी मी असेच वागणार, राज्यात शिंदे सरकारचे आमदार इतके बेफाम झाले आहेत. सत्ता मिळाली म्हणजे तुम्हाला इतकी मस्ती आली का? अजून हे सरकार विधी मान्य नाही, हे लक्षात ठेवा, असा सज्जड दम विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला आहे. विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधार्यांचे वाभाडे काढले.
सरकारने प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित दानवे यांनी विधान भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, शिवसेनेचे नेते अनिल परब उपस्थित होते.
आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, शेकापक्ष, लोकभारती आदी सर्व विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मुळातच लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. अजूनही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला नाही. एकंदरीतच, हे अधिवेशन फार कमी काळाचं आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतही आम्ही कालावधी वाढवण्याबाबत सांगितलं आहे, अस अजित पवार यांनी सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करा
कोकणासह, विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थाच बंद पडली आहे. ज्या प्रकारे शेतकरी, शेतमजुरांना मदत झाली पाहिजे, ती होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही समाधानी नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 75 हजार अनुदान द्या. फळबागांच्या नुकसानापोटी हेक्टरी सव्वालाखाची मदत करा. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क माफ करा, अशी मागणी अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पीक कर्ज वाटपाचं टार्गेट ठेवलं त्याच्या निम्म्यानंही पीक कर्ज वाटप झालेलं नाही. जे महत्त्वाचे विषय आहेत, त्यावर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत आणि त्यावर चर्चा घडवल्या जात आहेत. आपण जय महाराष्ट्र म्हणतो, जय हिंद बोलतो, जय हरी बोलतो. आता वंदे मातरम् मध्येच काय काढलंय? त्याला विरोध नाही. पण, तुम्ही महागाईवर बोलत नाही. इंधन दरवाढीवर बोलत नाही. जीएसटी वाढीवर बोलत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला.