। पुणे । प्रतिनिधी ।
अजित पवार नाराज आहेत, कुठेतरी गेलेत अशा चर्चा उठवण्यात आल्या. माझ्याशिवाय यांचं काय नडतं मला कळत नाही. दादाला काय खासगी आयुष्य आहे की नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केला.
शिर्डी येथील पक्षाचे चिंतन शिबीर अर्ध्यावरच सोडून अजित पवार हे कुटुंबियांसह विदेशात गेले होते. त्यावरुन ते नाराज असल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये जोरदार सुरु होती. विदेशातून परत आल्यावर पवारांनी या वृत्ताचा समाचार घेतला.
गेल्या पाच-सहा वर्षात मला विदेशात जाण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. माझा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता. पण कारण नसताना बदनामी, गैरसमज निर्माण करण्यात आले. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढलं होतं आणि त्यासाठीच गेलो होतो, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान याआधी प्रसारमाध्यमांसमोरही त्यांनी नाराजी जाहीर केली. नाराजीच्या चर्चांच्या बातम्या देणार्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी खापर फोडलं. तुम्ही मध्यंतरी आजारी असल्याच्या चर्चा होत्या, असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौर्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही फालतू बातम्या देतात, असं ते म्हणाले.