राज्यस्तरीय पक्ष म्हणून मान्यता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतांच्या संख्या लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार) राष्ट्रीय दर्जा काढून घेत राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटाला हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उबाठा) या दोन पक्षांना निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर यामधील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला चिन्ह देण्याचा निर्णय या अगोदर आयोगाने घेतला होता. त्यानंतर आता या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देण्याचा निर्णयही निवडणूक आयोगाने घेतला. कोणत्याही राजकीय पक्षाला राज्य आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देताना लोकप्रतिनिधींना मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली जाते. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यासाठी 1968 च्या निवडणूक आयोग पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या नियमानुसार निकष ग्राह्य धरला जातो. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेऊन आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूट पडण्याच्या अगोदर राष्ट्रीय पक्ष होता. फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले, मात्र त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला नाही. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही राज्यस्तरीय दर्जा दिला आहे. याचे कारणही लोकसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
पिपाणी चिन्ह गोठवले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीत अपक्षांना दिले जाणारे पिपाणी चिन्ह गोठविले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे या चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. आता हे चिन्ह गोठविण्यात आले आहे.