महायुतीतून अजित पवार साईड ट्रॅक?

कमळ चिन्हावर लढण्याची संधी द्या कार्यकर्त्यांची मागणी; शेलारांना कार्यकर्त्यांनी भांबावून सोडले


| रायगड | खास प्रतिनिधी |

48 लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमासा भाजपाकडून करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक शनिवारी अलिबाग येथे पार पडली. भाजपा नेते आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला. अजित पवार गटाला आपल्यासोबत घेऊन फार मोठी चूक केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ नका. कमळ चिन्हावर लढण्याची संधी आम्हाला द्या, अशी मागणी करत त्यांनी शेलारांना चांगलेच भांबावून सोडल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे महायुतीतून अजित पवार गटाला साईट ट्रॅक करण्याच्या हालचाली नजीकच्या कालावधीत वाढल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

राज्यातील पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजपाने केले होते हे आता लपून राहिलेले नाही. राज्यातील जनतेला हे फारसे आवडले नसल्याने भाजपाला मतदारांनी जागा दाखवली आहे. सर्वाधिक जागा लढूनही भाजपाला फक्त 9 जागांवरच विजय मिळवता आला आहे, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाला सात आणि अजित पवार गटाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. फोडाफोडीच्या राजकारणात भाजपाचे हात चांगलेच पोळून निघाले आहेत. त्यामुळे आता भाजपा सावध पवित्रा घेत असल्याचे दिसत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याने मतदारांची सहानुभूती थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळाली, भाजपा आता हे जाणून आहे. 48 लोकसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थिती काय आहे, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विधानसभेच्या निवडणुकीबाबत भूमिका काय आहे. हे जाणून घेण्यासाठी आशिष शेलार शनिवारी अलिबाग-चोंढी येथील हॉटेल साईन येथे आले होते. या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोखठोक भूमिका घेतली. महायुतीमध्ये अजित पवार गटाला घेऊन आपण चूक केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही, असे अलिबाग आणि श्रीवर्धनमधील पदाधिकार्‍यांनी शेलार यांना सांगितले. विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर अजित पवारांना सोबत नको, अशी मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपण आजून किती दिवस इतरांना निवडून आणण्यासाठी काम करायचे. आम्हाला कमळ चिन्हावर लढण्याची संधी द्या, अशी मागणी केल्याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसताच शेलार यांना काहीकाळ सुचेनासे झाले. त्यांनी थेटपणे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याबाबत शब्द दिला नाही. शेलार यांनी हा विषय गुंडाळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रश्‍नी भाजपाच्या वरिष्ठांनी निर्णय न घेतल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Exit mobile version