। पुणे । प्रतिनिधी ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. अत्यंत शोकाकूल वातावरणात आज (दि.29) अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मंत्राग्नि दिला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या प्रेमाची साक्ष देत होता. अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते.





