| मुंबई | वृत्तसंस्था |
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शनिवारी शिवबंधन बांधले.
मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वाघेरे हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आहेत. अजित पवारांचे ते अत्यंत विश्वासू मानले जात होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी वाघेरे यांनी दोनवेळा तयारी देखील केली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. दुसरीकडे आता मावळमधून पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून इच्छुक आहेत. त्यामुळे आता मावळमधून वाघेरे हे पार्थ पवार यांना आव्हान देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वाघेरे यांनी 25 डिसेंबर रोजी ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी मावळ लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी वाघोरे यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याचेही बोलले जाते.