अजित पवारांची पाऊले भाजपच्या दिशेने

| मुंबई | प्रतिनिधी |

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे 16 आमदार फोडण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. तसेच शिंदे यांचे वारसदार म्हणून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. तशा राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.सार्‍यानाच उत्सुकता आहे ती सत्तासंघर्षाच्या निकालाची.

राजकीय  सत्तासंघर्षाचा  निकाल एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसे घडल्यास राज्यातील सत्ता जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ती टाळण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस पार्ट टू सुरु केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या 16 आमदारांनाच गळाला लावल्याचे बोलले जाते. शिवाय अजितदादा हे मुख्यमंत्री झाल्यास पक्षातील 30 ते 40 आमदारांचा त्यांना सहज पाठिंबा मिळेल आणि ते पण पक्षांतर्गत विरोधी कारवाईपासून वाचू शकतात, असे सुत्रांचे म्हणणे आहे.

दि.8 एप्रिलला अजित पवार हे नॉटरिचेबल नव्हते. पण ते दिल्लीत एका खाजगी विमानाने गेले होते. त्यावेळी त्यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा उपस्थित होते. दिल्लीत त्यांनी भाजपचे अमित शाह यांची भेट घेऊन सरकार स्थापनेबाबत चर्चा केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महत्वाची खातीही अजित पवार गटाला देण्यास भाजपने अनुकुलता दर्शविली आहे. त्याच दरम्यान, शरद पवार हे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेससमवेत चर्चा करीत होते. पण त्या बैठकीला प्रफुल्ल पटेल हे अनुपस्थित होते. ते अजित पवार यांच्यासमवेत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात गुंग होते, असेही या सुत्रांनी अधोरेखित केलेले आहे.

गेल्याच आठवड्यात शरद पवार यंनीही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना भाजपमध्ये येण्यासाठी समस्त कुटुंबावर भाजपने राजकीय दबाव टाकल्याचे ठाकरे यांना सांगितले, असे खा. संजय राऊत यांनी सामनातील  त्यांच्या रोखठोक या सदरात नमूद केलेले आहे. मी पक्ष म्हणून भाजपसोबत कदापि जाणार नाही. पण कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांचा निर्णय असल्याचे सांगत एकप्रकारे अजित पवार यांना मोकळीकच दिल्याचेही राऊत यांचे म्हणणे आहे.

आता सर्वानाच उत्सुकता आहे ती सत्तासंघर्षाच्या निकालाची तो एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यावरच हे राजकीय सत्तांतर अवलंबून असणार आहे.

Exit mobile version