रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यात अस्थिकलश पोहचणार
। नेरळ । प्रतिनिधी ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले. तर आज हा अस्थी कलश फुलांनी सजवलेल्या रथामधून खोपोली येथे नेण्यात आला त्यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे दिवंगत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर एकत्रित करण्यात आलेल्या अस्थी यांचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सार्वजनिक केले आहे. रायगड जिल्ह्यासाठी बारामती येथून निघालेला रथ सोमवारी कर्जत येथे आला होता. हा अस्थी कलश आज कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे अस्थी कलश दर्शन प्रसंगी कर्जत नगरपरिषद अध्यक्ष पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, गटनेते महेंद्र चंदन तसेच बहुसंख्य नगरसेवक, नगरसेविका यांची उपस्थिती होती. त्यानंतर हा रथ कार्यकर्त्यांच्या अनेक गाड्यांच्या ताफ्यासह खोपोली- खालापूर येथे निघाला आहे. आता हा रथ पुढील काही दिवस कर्जत तालुक्यातील प्रमूख शहरांमध्ये नेला जाणार आहे. तसेच श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे त्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार असून, रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते तेथे उपस्थित राहणार आहेत.






