पवित्र भूमीत त्यांना अखेरचा निरोप
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिहरेश्वर या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत श्रद्धेने आणि विधिवत विसर्जन करण्यात आले. या भावूक प्रसंगी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता. अस्थीविसर्जन सोहळ्यावेळी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आ. अदिती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे यांच्यासह निकटवर्तीय सहकारी, राष्ट्रवादी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैदिक मंत्रोच्चारात हा विधी पार पडत असताना उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात असह्य वेदना दाटून आल्या होत्या. दादांसोबत घालवलेले क्षण, त्यांचे मार्गदर्शन, आपुलकीचा स्वभाव आणि विकासाबाबतची तळमळ यांची आठवण काढताना अनेकजण भावूक झाले. हरिहरेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांनी सातत्याने लक्ष दिले होते. या तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधा, पर्यटन विकास आणि स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी आस्थेने विचारणा केली असल्याचे अनिकेत तटकरे यांनी भावूक शब्दांत सांगितले.
ज्या हरिहरेश्वरच्या विकासासाठी दादांनी मनापासून प्रयत्न केले, त्याच पवित्र भूमीत त्यांना अखेरचा निरोप द्यावा लागत आहे, ही भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे सांगताना अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी उपस्थितांनी दादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादा आज शारीरिक रूपाने आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, कार्य आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी सदैव आमच्या मनात जिवंत राहील, अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आल्या.
मंदिर परिसरात मौन
अस्थीविसर्जनानंतर हरिहरेश्वरच्या मंदिर परिसरात काही काळ मौन पाळून दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगाने संपूर्ण श्रीवर्धन तालुका आणि परिसरात शोककळा पसरली असून, दादांची उणीव कधीही न भरून निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
