अक्कादेवी धरण तुडूंब भरले

पर्यटकांना आनंद लुटण्याची संधी

। उरण । वार्ताहर ।

विश्रांती घेतलेल्या पावसाने सुरुवात केल्याने निसर्गाच्या कुशीत डोंगरदर्‍यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे.

उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरोधात झालेला स्वातंत्र्यलढा, अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षासहलीसाठी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोर्‍यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे घडत आहे. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे धोकाविरहित हे धरण आहे. त्यामुळे पर्यटन वाढत असल्याने व्यावसायिक खुश आहेत.

Exit mobile version