अलिबाग नगरीत विठ्ठल नामाचा गजर…

भक्तीमय, संगीतमय नाट्यकृतीचे सादरीकरण
। सायली पाटील । अलिबाग ।

कलियुगात माणसाचं माणूसपण संपत चाललं आहे, माणूसकीही तशी फारशी उरलेली दिसत नाही. परंतु अशा या कलियुगातही जर काही संपलं नसेल तर ते म्हणजे विठ्ठलाच्या निस्सीम भक्तांचं त्यांच्या विठ्ठलावरचं प्रेम आणि जर काही थांबलं नसेल तर ती म्हणजे वारकर्‍यांची विठ्ठल वारी. आणि या अशाच आशयाला धरून शनिवारी (दि.28) अलिबाग पीएनपी नाट्यगृहात ॥ विठ्ठल विठ्ठल ॥ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास आ.जयंत पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक कृषीवल होते.


ही भक्तीमय आणि संगीतमय नाट्यकलाकृती पाहण्यासाठी पीएनपी नाट्यगृहात वारकरी सांप्रदायातील अनेकजण आणि कलाकार अशी एकंदरित अलिबागकरांनी हजेरी लावली होती. शेतकरी, विठ्ठल, विठ्ठलभक्त, विठ्ठलाची वारी, सध्याचे कलियुग या सार्‍याचा मेळ घालत केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. नक्कीच काहीतरी वेगळं असं या नाटकातून पाहायला मिळणार असल्याची खात्री नाटक सुरू होण्याआधीच प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होती. नाटक सुरू असताना नाट्यगृहातील वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते. प्रत्येकजण हरिनामाच्या गजरात अगदी तल्लीन झाला होता. अगदी नास्तिकालाही विठ्ठलाचे अस्तित्व पटेल इतकी सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडली गेली. नाटकाच्या शेवटी प्रत्येकजण अगदी थक्क होऊन त्यांच्या टाळ्यांमधून सादरीकरणाला दाद देत होता.


या द्विपात्री नाटकामधून एकीकडे विठ्ठलाचा निस्सीम भक्त असणारे वडील आणि दुसरीकडे फक्त काम आणि कष्टावर विश्‍वास ठेवून जगणारा आणि वडिलांच्या विठ्ठलभक्तीवर सतत प्रश्‍न विचारणारा मुलगा अशा दोन विरोधाभासी पात्रांनी हे नाटक अतिशय खुलवले. काम आपण करायचे आणि श्रेय विठ्ठलाला द्यायचे अशी विचारसरणी असलेला मुलगा वडीलांच्या भक्तीवर सतत प्रश्‍नांचा भडीमार करत असतो. संपूर्ण नाटकामध्ये प्रत्येक पात्रावर अनेक संकटं आली. परंतु प्रत्येक संकटावर मात करत जेव्हा हे नाटक शेवटाला पोहोचतं तेव्हा विठ्ठल त्या मुलाच्या स्वप्नात येऊन त्याला पडत असणार्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देतो. तसेच संपूर्ण मानवजातीला संदेश देतो. अशाप्रकारे हे नाटक कळसाला पोहोचून समाप्त होते.


निषाद एंटरटेनमेंट निर्मित, अनंत थिएटर, पेझारी यांच्यावतीने विठ्ठलविठ्ठल या भक्तीमय आणि संगीतमय नाट्यकलाकृतीचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकाचे लेखन राजन पांचाळ यांनी केले असून, नेपथ्य मारुती बैकर, प्रमोद पाटील, निनाद पाटील, प्रकाश योजना, मिलन पाटील, पार्श्‍वसंगीत विक्रांत वार्डे, संगीत राजेंद्र म्हात्रे, पखवाज प्रतीक नाईक यांचे होते. या कार्यक्रमात राजेंद्र म्हात्रे, ऋग्वेद म्हात्रे हे विविध गीते सादर केली त्यांना अनिल पाटील यांनी कोरस म्हणून साथ दिली. याशिवाय रंगभूषा सुबोध धुमाळ, उदय पाटील, वेशभूषा रश्मी पांचाळ, पार्श्‍वसंगीत सहाय्य रंजन जाधव, निर्मिती सहाय्य निनाद पाटील, सूत्रधार देवेंद्र केळुसकर, व्यवस्थापन प्रतीक पानकर, सुभाष इंदूलकर, प्रसिद्धी शुभम धुमाळ, संकल्प केळकर यांनी सदर कामे पाहिली.


तसेच या कार्यक्रमाप्रसंगी जीवनगौरव पुरस्कार, हरिभक्त पारायण, नाट्यमंडळ, विशेष सन्मान हे पुरस्कारही देण्यात आले. यामध्ये हरिश्‍चंद्र पाटील (दिग्दर्शक, शहाबाज), अप्पा शिवलकर (संगीतकार, भोनंग), सदानंद पाटील (रंगभूषाकार, वाघ्रण), पुरूषोत्तम पाटील (अभिनेता, माणकुळे), पांडुरंग माळी (अभिनेता, नवखार), प्रकाश म्हात्रे (अभिनेता, पेझारी), विजया कुडव (अभिनेत्री, काळोशी), राजू गुरव (दिग्दर्शक, भेरसे), सुनील धुमाळ (लेखक, नांगरवाडी), सुनिता नेवरेकर (अभिनेत्री) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावळाराम पाटील (माणकुळे), अंबरनाथ राऊत (पोयनाड), अजित नाईक (थळ), अशोक भोपी (बेलोशी-वावे), विद्याधर निळकर (देहेन), सुभाष शेळके (सांबरी) या हरिभक्त पारायण करणार्‍यांना सन्मानित करण्यात आले. हनुमान नाट्यमंडळ मेढेखार, मरिदेवी नाट्यसंस्था माणकुळे, नवज्योत नाट्यमंडळ नवखार, कलाविभाग ग्रामस्थ मंडळ नारंगी, श्री हनुमान नाट्यमंडळ पिटकीरी, हनुमान नाट्यमंडळ शहाबाज, हनुमान नाट्यमंडळ भेरसे, युगांतर नाट्यमंडळ बोरघर, श्री विठ्ठल रखुमाई नाट्यमंडळ उसर, श्री हनुमान नाट्यमंडळ दिवी पारंगी, मोरया क्रिएशन चौल, श्री विठ्ठल प्रासादिक नाट्यमंडळ बेलोशी, धावीर नाट्यमंडळ नांगरवाडी, श्रीराम नाट्यमंडळ वावे, बापदेव नाट्यमंडळ तळ या नाट्यसंस्थांना सन्मानित करून रमेश धुमाळ, डॉ.वारे (नेरूळ) यांना विशेष सन्मान देण्यात आला.

सगळा माहोल पाहून 50 वर्षांपूर्वीचा काळ मला आठवला. आपल्या ग्रामीण कलाकारांना व्यावसायिक क्षेत्रात संधी मिळायला हवी हाच माझा उद्देश आहे. ग्रामीण भागातील कला टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. बहुजनांची उन्नती करण्यासाठी संत तुकारामांनी केलेले कार्य इतिहास कधीच पुसू शकणार नाही. पण सध्याचं वास्तव पाहता भजन संस्कृती संपेल की काय ? असा प्रश्‍न पडला आहे. भजन मंडळं, नाटक वाढायला हवं. त्यामुळे भजन स्पर्धा आयोजित करा. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण व्हायला नको. कारण, जो कलाकार आहे तो आपला आहे. त्यामुळे कलाक्षेत्रातील कलांना आणि कलाकारांना आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत राहू.

आ.जयंत पाटील.
Exit mobile version