। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
स्पेनचा युवा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ याला शुक्रवारी (दि.30) पराभवाचा धक्का बसला आहे. नेदरलँड्सच्या बोटीक वॅन डी झँडस्कल्प याने अल्काराझ याच्यावर 6-1, 7-5, 6-4 अशी सरळ तीन सेटमध्ये मात केली आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला आहे.
अल्काराझ याने यावर्षी फ्रेंच ओपन व विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅमच्या जेतेपदावर मोहोर उमटवली होती. मात्र, अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याच्या त्याच्या आशांवर पाणी फेरले गेले. याआधीपर्यंत अल्काराझ याने ग्रँडस्लॅममध्ये सलग 15 सामन्यांत विजय साकारला होता. मात्र, त्याची ही विजयी मालिका खंडित झाली आहे.
कार्लोस अल्काराझ याने यंदा फ्रेंच ओपन व विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅमच्या विजेतेपदावर मोहोर उमटवत आपली धमक दाखवली होती. पॅरिस ऑलिंपिकमधील टेनिस या खेळातील पुरुष एकेरी विभागात त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, पण नोवाक जोकोविचकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे अल्काराझला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. अमेरिकन ओपनमध्ये तर त्याचे आव्हान दुसर्या फेरीतच संपुष्टात आले होते.