तळोजा वसाहतीत मद्यविक्री सुरू

| पनवेल । वार्ताहर ।
खारघरमध्ये दारूबंदी असताना तळोजा फेज एक वसाहतीत मद्यविक्री सुरू झाली आहे; तर बिअर दुकान सरकारची परवानगी घेऊनच सुरू करण्यात आल्याचे दुकान मालकाने सांगितले. त्यामुळे परिसरातील दारूबंदीच्या निर्णयाबाबत नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

खारघर प्रभाग कार्यालयाअंतर्गत असलेली खारघर वसाहत दारूमुक्त म्हणून ओळखली जाते. कोपरा गावात ग्रामपंचायतीच्या काळात एक बार सुरू झाला होता. खारघर वसाहतीच्या विकासात भर पडल्यावर सुरू झालेले वाईन शॉप नागरिकांनी मोर्चे, आंदोलने करून बंद पाडले. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर संपूर्ण पालिका क्षेत्रात दारूबंदीचा ठराव केला; मात्र सदर ठराव गेल्या चार वर्षांपासून सरकारदरबारी धूळ खात पडून आहे. पालिका अस्तित्वात आल्यावर सत्ताधार्‍यांनी क्षेत्रात दारूबंदीचा ठराव केल्यानंतर पालिकेच्या परवानगीने तळोजा वसाहत सेक्टर 19 मध्ये बिअर शॉप सुरू झाले आहे; मात्र सदर नोड हे नावडे प्रभागात समावेश असल्याने परवानगी देण्यात असल्याचे सांगण्यात आले; मात्र तळोजालगत असलेल्या खारघर वसाहतीत दारू विक्रीस बंदी असताना तळोजा फेज एक वसाहतीत सेक्टर दोनमध्ये बिअर शॉप सुरू झाल्याने नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहे.

प्रशासनाकडे तक्रार
दुकान सुरू करताना सोसायटीची परवानगी आवश्यक आहे; मात्र परवानगी घेताना दस्तावेज अवैध जोडल्याचे समजते. तसेच तळोजा वसाहतीत दारूचे दुकान सुरू झाल्यास तरुण पिढी दारूच्या आहारी जाण्याची शक्यता असल्यामुळे काही जागरूक नागरिकांनी पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रार दाखल केल्याचे समजते.

Exit mobile version