नागपूरच्या अल्फियाला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण

| नागपूर | प्रतिनिधी |

नागपूर विभागासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी करत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात तिकीट तपासनीस (टीटीई) म्हणून कार्यरत असलेल्या अल्फिया पठाण हिने 9 व्या एलिट सीनियर राष्ट्रीय पुरुष व महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नुकत्याच पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करताना अल्फियाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

अंतिम फेरीत हरियाणाच्या बलाढ्य प्रतिस्पर्धी खेळाडूचा पराभव करत अल्फियाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे केवळ भारतीय रेल्वेच नव्हे, तर विशेषतः मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर वाढला आहे. खेळातील तिची चिकाटी, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अल्फियाच्या या यशामागे संघर्षाची आणि जिद्दीची दीर्घ कहाणी आहे. 2014 साली प्रदर्शित झालेल्या महिला बॉक्सर मेरी कॉम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा तिच्यावर खोल परिणाम झाला. त्याच काळात प्रशिक्षक पुरोहित यांनी दाखवलेला विश्वासही तिच्यासाठी निर्णायक ठरला. तो चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटले की आपणही हे करू शकतो,असे अल्फिया सांगते. मात्र, बॉक्सिंगसारख्या पुरुषप्रधान खेळात प्रवेश करण्याचा निर्णय सोपा नव्हता. जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितले की मला बॉक्सिंग करायचे आहे, तेव्हा ते फारसे उत्सुक नव्हते. मुस्लिम कुटुंबांमध्ये मुलींना क्रीडाक्षेत्रात, विशेषतः बॉक्सिंगसारख्या खेळात पाठवण्याबाबत संकोच असतो,फफ असे ती स्पष्टपणे नमूद करते. नातेवाईकांकडूनही विरोध झाला. सर्वजण आई-वडिलांना मला खेळू देऊ नका, असे सांगत होते,असे ती आठवते. मात्र सातत्याने दहा-बारा दिवस प्रयत्न केल्यानंतर पालकांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

बॉक्सिंगकडे वळण्यामागे मोठ्या भावाचा खेळाशी असलेला संबंधही कारणीभूत ठरल्याचे अल्फिया सांगते. लहानपणी भाऊ-बहिणी जे करतात तेच आपल्यालाही करावेसे वाटते. कदाचित ते थोडे बालिश वाटेल, पण माझ्यासाठी तो मोठा प्रेरणास्त्रोत होता, असे ती हसत सांगते.नोकरीची जबाबदारी सांभाळत क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च यश मिळवणे हे सोपे नाही. मात्र अल्फियाने शिस्त, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर हे शक्य करून दाखवले आहे. तिचे हे यश नागपूर विभागातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मध्य रेल्वे, नागपूर विभागाने अल्फिया पठाण हिचे या दैदीप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version