Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा कारनामा

| रायगड | प्रमोद जाधव |

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाकगृहाचा वापर चक्क गोदाम म्हणून होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णांच्या पोषण आहारासाठी असलेल्या जागेचा वापर साहित्य साठवण्यासाठी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील हा प्रकार प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दाखवत आहे. पाकगृहाला गोदामाचे स्वरूप देत प्रशासनाने रुग्णांच्या आहार व्यवस्थेलाच वाऱ्यावर सोडले असून गाद्या, खाटा आणि टेबलांच्या पसाऱ्यामुळे रुग्णालयातील व्यवस्थेचा ढिसाळ कारभार उघडकीस आला आहे.
पोषण आहार तयार होणाऱ्या ठिकाणी साहित्याचा ढीग लावल्याने प्रशासनाच्या नियोजनावर संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र पाकगृह उभारण्यात आले आहे. या पाककलेतील स्वच्छतेबाबत दखल घेण्याचे काम केले जाते. तसेच, कोणालाही या पाकगृहात विनाकारण फिरकूनही दिले जात नाही. मात्र, हेच पाक गृह गोदाम बनल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी रुग्णालयातील गादी, टेबल व खाटांचा पसारा दिसून आला आहे. रुग्णालयात या वस्तू ठेवण्यासाठी पुरेसी जागा नसल्याने पाकगृहात हे साहित्य ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्ण प्रशासनाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत 40 वर्षे जूनी असून, 250 खाटांचे असलेल्या रुग्णालयात हजारो रुग्ण उपचार घेतात. अलिबागसह पोलादपूरपासून पनवेल, कर्जत, खालापूर, मुरूड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा अशा अनेक भागातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. या जिल्हा रुग्णालयातील सर्जिकल मेडिकल दक्षता विभाग अशा वेगवेगळ्या विभागात रुग्णांवर उपचार केले जातात. उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी रुग्णालयाच्या तळमजल्यावर पाकगृह आहे. या पाकगृहामार्फत भोजन व इतर पोषण आहार तयार केले जाते. मागील वर्षी याच पाकगृहातील स्लॅब कोसळण्याची घटना घडली होती. या समस्या असताना रुग्णालयातील पाकगृह आता गोदाम बनल्याचे चित्र समोर आले आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने खरेदी केलेले टेबल, गादी व खाटा इत्यादी साहित्य या पाकगृह कक्षामध्ये ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयात हे साहित्य ठेवण्यासाठी जागा पुरेसी नसल्याने पाकगृहाला गोदाम बनविण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णालयातील प्रशासनाच्या या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाकगृहात स्वच्छतेचा दिखावा
रूग्णालयाचे पाकगृह असलेल्या मागील भागात गवतांनी विळखा घातला आहे. त्या परिसराची स्वच्छता करण्यास रुग्ण प्रशासन उदासीन ठरले आहे. पाकगृहामध्ये रुग्णालयातील साहित्य ठेवून प्रशासनाकडून स्वच्छतेचा दिखावा केल्याचे दिसून येत आहे. खाट, टेबल, गादी इत्यादी साहित्य या पाकगृहामध्ये पडून असल्याचे बोलले जात आहे.
Exit mobile version