शेकापच्या दणक्याने अलिबाग-रोहा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेली दोन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या अलिबाग रामराज मार्गे रोहा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी शेकापक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या दणक्यानंतर तिसर्‍या दिवसापासूनच या मार्गावरील खड्डे भरुन रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. वावे नाका येथून सुरु करण्यात आलेल्या या कामातून बेलकडे पर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत सदर रस्ता दुरुस्त करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी दिली.

अलिबाग-रोहा रस्ता गेली अनेक वर्षे हा खड्डेमय आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन त्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून निधी मंजूर करुन आणला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रस्त्याच्या कामाचे राजकारण करुन तत्कालिन सरकारने निविदा अडवल्याने शेकापचा पराभव झाला. त्यादरम्यान निवडून आलेल्यांनी वल्गना करीत 25 तारखेपासून त्वरित रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते.

मात्र अडीच वर्षे होऊनही काम अपूर्णच आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी शेकापतर्फे या रस्त्यासाठी बुधवारी 13 ऑक्टोबर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकापक्षाच्या आक्रमक भुमिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी ठेकेदाराचे प्रतिनिधी यांच्यासह आंदोलनस्थळी येत शनिवारपासून रस्त्यावर पडलेले खड्डे भरून देणार असून वर्षभरात तीन लेअर रस्ता सुडकोली पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन दिले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार आजपासून अग्रवाल कंत्राटदार कंपनीकडून सदर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 14 किलोमीटर अंतरावरील खड्डे डांबर, खडी आणि रोलींग करीत बुजविण्यात येणार आहेत. सदर काम दिवाळीपुर्वी पुर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे तसेच अग्रवाल कंत्राटदार कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

जनतेच्या समस्येसाठी जेव्हा जेव्हा शेकाप रस्त्यावर उतरतो तेव्हा तेव्हा निकाल जनतेच्या बाजूनेच लागतो. शेकापच्या रास्ता रोकोनंतर हेच आम्ही दाखवून दिले आहे. आम्हाला दिलेल्या आश्‍वासनानुसार जनतेच्या भावनांचा मान राखून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केल्याबद्दल त्यांचे शेकाप आणि जनतेच्या वतीने आभार.


चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version