अलिबाग हादरले! लव्ह, धोका आणि आत्महत्या; शेवटच्या क्षणी घालवले प्रेमाचे क्षण

। अलिबाग । भारत रांजणकर ।

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले अलिबाग शहर मंगळवारी हादरले ते दोन चिमुकल्यांची हत्या आणि युगुलाची गळफास लावून केलेल्या आत्महत्येच्या घटनेने. मृत महिलेच्या पतीने 2 मे रोजी आपली पत्नी प्रियांका तर प्रियकर कुणाल याच्या कुटूंबियांनीही हरवल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण आले आहे.

महिला आपल्या दोन लहान मुला-मुलींना घेवून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती 11 मे रोजी आपल्या प्रियकरासोबत अलिबाग येथे आली. सहा दिवस अलिबाग परिसरात पर्यटनाचा आनंद या चौघांनीही लुटला. मात्र 16 मे रोजी रात्रीचे जेवण करून त्यांनी रूम आतून लावून घेतली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत रूममध्ये शांतता होती. कोणतीही हालचाल दिसत नसल्याने कॉटेज मालकाने मंगळवारी (दि. 17) दुपारी तीन वाजता दुसर्‍या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी रुममध्ये चारही जण मृतावस्थेत आढळून आले.

प्रियांका व कुणाल यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर होते. कॉटेज मालकाने त्वरित अलिबाग पोलिसांना कळवले. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतांच्या कुटूंबियांना याबाबत कळविण्यात आले. मुलांना विष पाजून नंतर प्रियांका व कुणाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिक्रपुर पोलीस ठाण्यात मृत महिलेची मिसिंग तक्रार दाखल होणं, त्यानंतर तिचं प्रियकरासोबत अलिबागला येणं आणि आत्महत्या करणं, हा धक्कादायक प्रकार असून या घटनेमागे नेमकं कारण काय, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

शिक्रापुर पोलीस अलिबागमध्ये दाखल
शिक्रापूर पोलीस अलिबागमध्ये दाखल झाले असून प्रेमीयुगुलांनी अखेरच्या घटका मोजत असताना एकमेकांसमवेत प्रेमाचे क्षण घालवत आत्महत्या केली. तसेच त्याचा व्हिडिओ केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी रुममधून मोबाईल ताब्यात घेतला असून लवकरच तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. तसेच फोन लॉक असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माहिती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version