अलिबागकर पूर्णवेळ तहसिलदारांच्या प्रतीक्षेत

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

तीन महिन्यांपूर्वी अलिबागच्या तहसीलदार मिनल दळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईननंतर तहसीलदार म्हणून विशाल दौंडकर यांच्याकडे अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. तीन महिने पूर्णवेळ तहसीलदार नसल्याने प्रचंड हाल होत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. कामावरही त्याचा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. अलिबाग तहसील कार्यालयाला पुर्ण वेळ तहसीलदाराची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले विशाल दौंडकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली आहे.

अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. याठिकाणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद, जिल्हा पुरवठा अधिकारी अशी वेगवेगळी कार्यालये आहेत. तसेच अलिबागमध्ये तालुक्याचे तहसील कार्यालयही कार्यरत आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अलिबागमधील सरकारी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त वर्दळ नेहमी असते. अलिबाग तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून मिनल दळवी कार्यरत होत्या. परंतू त्यांना लाच घेतल्याप्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी अटक केल्यापासून हे पद रिक्त होते. त्यांच्या रिक्त जागेचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागात कार्यरत असलेले तहसीलदार विशाल दौंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या 10 डिसेंबरपासून विशाल दौंडकर या कार्यालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. अलिबाग तहसील कार्यालयाला गेल्या महिन्याभरापासून पुर्ण वेळ तहसीलदार नसल्याने त्याचा ताण कर्मचार्‍यांसह कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना प्रचंड होत आहे. पुर्ण वेळ नसल्याने कामाचा वेगही मंदावला असल्याची चर्चा तहसील कार्यालयात जोरात सुरु आहे. त्यामुळे अलिबाग तहसील कार्यालयाला पुर्ण वेळ तहसीलदारांची प्रतिक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्याचे ठिकाण असतानाही अलिबाग तहसील कार्यालायला पुर्णवेळ तहसिलदार देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनाही होत आहे. जिल्हा प्रशासन अलिबाग तहसील कार्यालयाला पुर्ण वेळ तहसीलदार कधी याकडे नागरिकांसह कर्मचार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version