दीपसंध्येने अलिबागकरांची दिवाळी सूरमयी

| अलिबाग । प्रतिनिधी ।

दीपावलीच्या पूर्वसंध्येला अलिबागकारांनी सुरेल संगीतबद्ध गायनाच्या सोहळा अनुभवला. अलिबाग येथील सावी फाऊंडेशन आयोजित आणि स्वरगंध निर्मित दीपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर संगीत आणि गायनाने अलिबागकर मंत्रमुग्ध झालेले पहावयास मिळाले. सूर निरागस हो, माझे माहेर पंढरी, राधा ही बावरी, रेशमाच्या रेघांनी अशा भक्तीगीत, भावगीत, लावणी प्रकारातील गीतांनी अलिबागकरांची संध्याकाळ सूरमयी झालेली पहावयास मिळाली.
अलिबागनजीकच्या कुरुळ येथील क्षात्रैक्य समाजमंदिरामध्ये तिन्हीसांजेच्या कातरवेळी गायकांनी छेडलेले सूर आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या गायनाला दिलेली साथ यामुळे दीपावलीच्या पूर्वसंध्येला संगीतबद्ध वातावरणात टाळ्यांचा तालबद्ध आवाज सभागृहात निनादला होता.

सोनाली कर्णिक, अभिषेक मारोटकर, प्रशांत काळूद्रेकर, स्मुग्धा माळी आणि डॉ. विशाखा मोडक या गायकांच्या आवाजातील सुमधुरता रसिकांनी अनुभवली. डॉ. विशाखा मोडक यांच्या स्वरांनी ‘मी स्वप्न पाहिले जे सांगू कुणास बाई’ या गीताने रसिकांची दाद मिळविली. या कार्यक्रमाची निर्मिती आणि संयोजन अतुल माळी, निवेदन धनश्री जोशी यांनी केले. वाद्यवृंदामध्ये असणार्‍या गौरव मुरकर, सचिन नाखवा, भावना अंकुश, अतुल माळी यांनी गायकांच्या स्वरांना सुमधुर संगीत देऊन दीपसंध्या अधिक बहारदार बनवली.

Exit mobile version