। अलिबाग । प्रतिनिधी ।
बालेवाडी पुणे क्रीडा संकुलमध्ये नुकत्याच झालेल्या तेरा वर्ष आतील मुलां-मुलींच्या कराटे स्पर्धेत अलिबागच्या मुलांनी बाजी मारली.
बालेवाडी पुणे क्रीडा संकुलमध्ये तेरा वर्ष आतील मुलां-मुलींच्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून साडेसातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात विराट वैभव पाटील (मुळे) याने कराटे फाईटमध्ये कांस्य पदक पटकावले, श्लोक सुजित पाटील (कार्ले) याने तीन राऊंड जिंकून कांस्य पदक पटकावले तर, श्रवण संदीप भोईर (सासवणे) याने उत्कृष्ट कराटे फाईट करून तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, अंश अल्हाद नाईक (कुणे) आणि अर्णव शैलेश घरात (पंथनगर) यांनीदेखील कराटे खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यांच्यासोबत कराटे ब्लॅक बेल्ट हरेश पाटील आणि वैभव पाटील यांनी कोच म्हणून काम पाहिले.
राज्य संघटनेचे अध्यक्ष सल्लाउद्दीन अंसारी सर, सचिव संदीप गाडे सर तसेच आंतरराष्ट्रीय पंच परमजीत सिंग यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि मेडल देऊन गौरवण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पंच व रायगड जिल्हा संघटनेचे सचिव संतोष कवळे यांनादेखील उत्कृष्ट पंच म्हणून गौरवण्यात आले.