अलिबाग शहर आणि मीनाक्षीताई…….

माझे मित्र, अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष भाऊ जगे मला नेहमीच म्हणायचे, “आनंद, आजचे आधुनिक अलिबाग जे दिसतेय, ते केवळ बेबीमुळे… अर्थात मीनाक्षीताई पाटील यांच्यामुळे.’’ अलिबाग हे तसे टुमदार शहर. जुनी कौलारू घरे, नारळ-पोफळीच्या वाड्या, आरसीएफ येण्याअगोदर, 1980 सालापूर्वी अलिबाग हे नोकरदारांचे शहर म्हणूनच ओळखले जाई. महाराष्ट्रात जिल्ह्याचे ठिकाण म्हणून अलिबाग शहर हे सर्वात लहान. अर्थातच नगरपालिकेचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे. पालिकेच्या उत्पन्नातील बराचसा खर्च पगारावरच व्हायचा.

अलिबागची भौगोलिक रचनाच अशी होती की, पूर्वेला खाडी आणि दक्षिणेला अरबी समुद्र. त्यामुळे शहराचा विस्तार होणं तसंही कठीणच होतं. 1977 साली तत्कालीन नगराध्यक्ष मा. दत्ताजीराव खानविलकर यांच्या प्रयत्नाने श्रीबाग क्षेत्रविकासची योजना आखली गेली. एसटी स्टँडलगतचे खारट, चेंढर्‍याच्या मागचा भाग काही शेती बरेचसे खारटच होते, तिथे भराव करून प्लॉटींगचे प्लॅनिंग ठरले. योजना सुरू झाली खरी; पण अनेक कारणास्तव पूर्णत्वात न्यायला विलंब झाला. योजनेतून मिळणारे उत्पन्न आणि प्लॉट विकसित करण्यासाठीचा खर्च याचे व्यस्त प्रमाण, यामुळे आर्थिकदृष्ट्या ही योजना पूर्णपणे फसली. माती भरावाचा चुकलेल्या अंदाजामुळे आधीच अडचणीत असलेली नगरपालिका आर्थिक संकटात आली. त्यातच शहरासाठीची पाणीपुरवठा योजना, अनेक वर्षे रखडलेली उमटे पाणीपुरवठा योजना 1979 साली कार्यान्वित झाली खरी; पण ढिसाळ नियोजनामुळे अक्षरश: आतबट्ट्याची ठरली. शहराच्या विकासकामांवर मर्यादा आली. त्यातच भरीस भर म्हणून 1979 ते 1984 या कालावधीत लोकनियुक्त नगरपालीकेची सत्ता जाऊन पालिकेवर प्रशासकीय कारभार आला. नगरपालिका कारभार यथातथाच सुरू होता. 1985 साली निवडणुका झाल्या आणि लोकनियुक्त कारभार सुरू झाला. पालिका स्थापनेपासूनची काँग्रेसची सत्ता जाऊन शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली. जयंतराव केळुसकर, भाऊ जगे, श्रीमती सुनिता नाईक हे नगराध्यक्ष झाले. दरम्यान, आरसीएफ कॉलनीमुळे शहराच्या आजूबाजूची वस्ती वाढली नि या सार्‍या व्यापार उदीमामुळे नगरपालिकेवरचा मात्र आर्थिक ताण अजून वाढला. वाढती वस्ती आणि तटपुंजे उत्पन्न यामुळे नगरपालिकेच्या समस्या वाढतच होत्या.

1995 साली मीनाक्षीताई पाटील आमदार झाल्या. त्यांनी अलिबागच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी पिण्याच्या-पाण्याच्या समस्येकडे लक्ष दिले. लोकसंख्या वाढतच होती, उमट्याचे पाणी अपुरे पडत होते, शिवाय पाण्याच्या क्वालिटीचाही प्रश्‍न होताच. उन्हाळ्यात तर अधिकच बिकट परिस्थिती होती. उमटे-अलिबाग पाईपलाईनवर गावोगावी अनेक कनेक्शन्स दिल्याने, शहरात कमी दाबाने पाणी येत असे. पारंपरिक विहिरी होत्या; पण त्यांचे पाणी मचूळ. त्यामुळे अलिबाग हे मचूळ पाण्याचे शहर म्हणून प्रसिद्ध होत होते. आरसीएफ कारखाना 1984 साली सुरू झाला. कारखान्यासाठी काळ प्रकल्पाचे पाणी एमआयडीसीच्या माध्यमातून कोलाडहून थळला आणले होते. कुरूळ-वेश्‍वी येथे शहराला लागूनच आरसीएफची टाऊनशीप वसली होती. कर्मचार्‍यांसाठी कंपनीने तेथपर्यंत पाणी आणले होतेच. आ. मीनाक्षीताईंनी हा प्रश्‍न हाती घेतला. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत आणि मंत्रीमहोदयांपर्यंत सर्वांसोबत यशस्वी चर्चा केली. थळ ते अलिबाग एमआयडीसीने सेपरेट पाईपलाईन टाकली आणि अलिबाग शहराचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटला. सोबतच मधली गावे, भाल, मानी, भूते, बामणोली, लोणारे, वरसोली, गोंधळपाडा येथील नागरिकांना त्या लाईनवरून चांगले पाणी मिळू लागले. अशा रीतीने या सर्व भागाचा पाणीप्रश्‍न आ. मीनाक्षीताईंमुळे कायमचा सुटला.

अलिबाग शहरासाठी एकच पाण्याची टाकी होती. त्यामुळे रामनाथ, कोळीवाडा या भागांना पाणी कमी दाबाने व अगदी थोडा वेळ मिळे. ताईंच्या प्रयत्नाने शहराच्या विविध भागात अजून तीन ओव्हरहेड टाक्या मंजूर झाल्या. अलिबाग शहराला चेहरा दिला, नावारूपाला आणले ते अलिबागचे राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी. अलिबाग शहराच्या मध्यभागी ‘छत्रीबागेत’ सरखेल कान्होजी आंग्रे आणि आंग्रे कुटुंबातील इतर सदस्यांच्या समाधी होत्या. मात्र, आजवर त्या अत्यंत दुर्लक्षित आणि खराब, पडीक अवस्थेत होत्या. रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांचे स्वप्न होते की, सरखेलांच्या समाधीचे सुशोभिकरण व्हावे आणि अलिबाग शहराचे ते एक प्रमुख आकर्षण व्हावे. परंतु, त्यात अनेक प्रशासनीक अडचणी होत्या. या जागेवर अनेकांचे अतिक्रमणही होते. या सुशोभिकरणासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले.. अगदी आरसीएफनेही प्रयत्न केले होते. अलिबागकरांचा हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित राहावा याची खंत प्रभाकर पाटील यांना होतीच. त्यामुळे आता आ. मीनाक्षी पाटलांनी या प्रश्‍नात लक्ष घालण्याचे ठरविले. या समाधीच्या जागेची मालकी आंग्रे कुटुंबाकडे होती. याकामी प्रभाकर पाटलांनी व्यक्तिगत लक्ष घातले आणि आंग्रे कुटुंबियांना विनंती केली. आंग्रे सरखेलही जमीन हस्तांतरणासाठी तयार झाले आणि या समाधीच्या सुशोभिकरणाचे काम मार्गी लागले. अर्थात, या सर्व कामात भाई जयंत पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे.

भारतातील पहिल्या सरखेलांची समाधीस्थळ असल्याने इंडियन नेव्हीला या कार्यात सामावून घेण्याचे ठरले. शिवाय, पुरातत्व खात्याचा अडसर होताच… आणि सर्वात महत्त्वाची आर्थिक तरतूद. सुरवातीचे काम, अतिक्रमणे हटविणे. भाई जयंत पाटील यांनी याकामी बहुमोल कामगिरी बजावली. प्रत्यक्ष उभे राहून सर्व अतिक्रमणे हटविली आणि पूर्ण एरीया मोकळा केला. नेव्हीचाही सहभाग असल्याने सारी कामे सोपी गेली. पुरातत्व विभागाकडून परवानग्या मिळाल्या. त्याकरिता मीनाक्षीताईंनी बरेच परिश्रम घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ताईंनी महाराष्ट्र सरकारकडून याकामी आर्थिक तरतूद करण्याचे भाग पाडले. इंडियन नेव्ही, पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र सरकार या तिन्ही विभागांमध्ये सततचा संपर्क ठेवून योग्य तो आर्किटेक्ट नेमून, समाधीचे व कंपाऊंड वॉलचे बांधकाम या सार्‍या गोष्टी ऐतिहासिक तारतम्य राखून पूर्ण करणे गरजेचे होते. कधी गोड बोलून, कधी जरब दाखवून तर कधी आमदारकीचा योग्य वापर करून मीनाक्षीताईंनी आंग्रे समाधीच्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा केला. मला आठवते, तत्कालीन मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्यावेळी भूमिपूजनाचा समारोह संपन्न झाला होता. आज सुशोभित आंग्रे समाधी अलिबागमधील पर्यटकांचे प्रमुख ठिकाण झाले आहे. आ. मीनाक्षीताई पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे सुशोभिकरण पूर्णत्वास आले.

अगोदर म्हटल्याप्रमाणे नगरपालिका नेहमीच आर्थिक अडचणीत असायची. अशावेळी छोटे रस्ते, गल्ल्यांचे रस्ते, गटारे या गोष्टींसाठी फंडची कमतरता असायचीच. रस्त्यांवर गाड्यांचे प्रमाण वाढतच होते. रिक्षा, टू व्हिलर, फोर व्हिलर यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ लागली. एसटी स्टँड परिसरात तर ही समस्या अधिकच बिकट होऊ लागली. शिवाय, स्टँड परिसरात सखल भाग असल्याने पावसाळ्यात अक्षरश: गुडघाभर पाणी दहा-पंधरा दिवस साचून राहू लागले. जवळपासच्या जुन्या घरांमध्ये पाणी जाऊ लागले. यासाठी स्टँडसमोरचा रस्ता रूंद होणे व गटारे होणे आवश्यक होते.. पण पैसे? ताई त्यावेळी मंत्रीपदावर होत्या. त्यांच्याच प्रयत्नाने आणि पुढाकाराने सध्याचा महावीर चौक ते पीएनपी नगर हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनला. अनेक छोट्या-मोठ्या कामांकरिता, त्या काळात ताईंचा आमदार फंडही बराचसा शहरावरच खर्च व्हायचा.

श्रीबाग नं.3 मधील हॉटेल प्राजक्ता ते पाटील मोटर्स या हमरस्त्यावर सध्या अनेक मोठ मोठ्या बँका व आदर्शसारखी पतसंस्था, इन्श्ाुरन्स कंपन्या, दवाखाने आहेत. परंतु एक काळ असा होता की या रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य होते. पावसाळ्यात तर चालणेही मुश्किल व्हायचे. नगरपालिकेकडे फंड नसल्याने जुजबी दुरूस्ती व्हायची. खाजण परिसर असल्याने जमीन पावसाळ्यात खचून जायची आणि त्यामुळे हा रस्ता कायमच खड्ड्यांचा राहिला. गाड्या विशेषत: एसटी खड्ड्यांतून अगदी डुलत-डुलत जायच्या. सारे नगरवासी या रस्त्यामुळे परेशान झाले होते. तिकडे श्रीबाग नं.1 व 2 चीही तशीच अवस्था होती. नवीनच भराव, ड्रेनेजची व्यवस्था नाही, यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्ते वाहून जायचे नि चिखलाचे साम्राज्य व्हायचे. इथेही सारे वैतागलेले… पण करणार काय? याही समस्येचे निराकरण करायला अलिबागच्या तारणहार म्हणून मीनाक्षीताई पुढे सरसावल्या. मा. प्रभाकर पाटलांनी झेडपीचा लॉन्गफॉर्म, ‘झटपट प्रोग्रेस’ असा केलेला. ते नेहमी म्हणत की, नियम-कायदे हे माणसांकरिता आहेत. माणसे नियमांसाठी नाहीत. लोककल्याणाकरिता एखाद्या नियमाला बगल दिली तरी ते क्षम्यच! लोकांची कामे नियमात बसवून ती पूर्णत्वास नेण्यात ते वाक्बगार! त्यांच्या या कार्य कौशल्यापुढे भलेभले आयएएस अधिकारीही अचंबित व्हायचे. मीनाक्षीताईंना हे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळालेलं.

अलिबाग नगरवासियांच्या या समस्या घेऊन ताई तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. नितीन गडकरी यांच्याकडे गेल्या नि त्यांना सारे ब्रिफ केले. ताईंसोबत त्यावेळी खुल्दाबादचे श्री. अशोक डोणगावकर हेही होते. सर्व रस्त्यांचे मजबुतीकरण, ड्रेनेज वगैरे धरून सर्व खर्च अंदाजे साठ-सत्तर लाखांचा होता. एवढा खर्च करण्यास मा. गडकरींनी असमर्थता दर्शविली. आता काय करायचे? त्याच क्षणी ताईंना महामहीम राज्यपालांचे अभिभाषण आठवले. अभिभाषण म्हणजे सरकारचे एकप्रकारे वचनच असते. अभिभाषणात सांगितले होते की, जिथे जिथे मंदिर असेल, तिथे तिथे रस्ता बांधला जाईल. (सरकार सेना-भाजपचे होते ना!) ताईंनी अभिभाषणातील हा मुद्दा मा. गडकरींच्या नजरेस आणून दिला. गडकरी, सरकारनेच मंदिर तिथे रस्ता हे धोरण निश्‍चित केले आहे. दोन्ही ठिकाणी मंदिरे आहेत. आता रस्त्याचे बजेट निर्माण करणे हे तुमचे काम. गडकरी हसत म्हणाले, ताई एखादे काम नियमात कसे बसवावे, ते तुमच्याकडूनच शिकावे आणि अशा तर्‍हेने श्रीबाग नं.1, 2, 3 या रस्त्यांची कामे मार्गी लागली. हे सारं झालं… पण, ती दोन मंदिरे कुठली?

एसटी स्टँड…..पाटील मोटर्स….. चेंढरे मारूती मंदिर….. श्रीबागमधील गणपती मंदिर. सरकारी नियमातील पळवाट शोधून लोककल्याणाची कामे करवून घेणं ताईंना बरोबर जमलं होतं. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नव्हतं. फाईल मंजुरीकरिता मंत्रालयातील बाबूंकडे गेली तेव्हा या कामाची वासलात कशी लावायची यावर डोकी लढवली गेली. ताई चिफ इंजिनिअरकडे स्वत: गेल्या. त्यांचाही नकाराचा सूर. ताई हे सगळं बरोबर आहे, पण तरीही रस्ता होणं मुश्कील दिसतंय. आता मात्र ताईंच पित्त खवळलं. त्यांनी खास शेकाप स्टाईल अस्त्र बाहेर काढलं. दरडावल्या स्वरात त्या अधिकार्‍याच्या अंगावर धावून गेल्या, जर हा रस्ता मंजूर केला नाहीत, तर या फाईलसकट तुम्हाला सहाव्या मजल्यावरुन खाली फेकेन. खास आगरी स्टाईल रायगडच्या रणरागिणीचा हा रौद्रावतार सचिवाने पाहिला आणि फाईलवर मुकाट्याने सही झाली. अशा तर्‍हेने प्राजक्ता हॉटेल ते श्रीबाग असा रस्ता मार्गी लागला… याचे श्रेय फक्त आ. मीनाक्षीताई पाटलांनाच! मित्रवर्य भाऊ जगे म्हणत ते खरंच आहे, जुन्या काळातील अलिबागला नवीन प्रगतीशील शहराचा चेहरामोहरा देण्यामागे माजी मंत्री मीनाक्षीताईं पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. आज ताईंचा वाढदिवस. ताईंना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

-आनंद कोळगांवकर, चेंढरे-अलिबाग

Exit mobile version