। अलिबाग । प्रतिनिधी ।
केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर केली होती. मात्र, 2018 मध्ये ‘आवास प्लस’ ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे तयार केलेल्या प्रतीक्षा यादीत काही पात्र कुटुंबांचा समावेश नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळू शकला नाही. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत सुधारित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गट विकास अधिकारी व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रशिक्षण रायगड जिल्हा परिषदेत शुक्रवारी (दि.21) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडले.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने 2012 मध्ये गावनिहाय ‘आवास प्लस’ हे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. त्यानंतर 2018 मध्ये या सर्वेक्षणाच्या आधारे गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली. या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने घरकुलाचा लाभ दिला जात आहे, पुढील काही दिवसात पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता असून, सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 हाती घेण्यात आला आहे.
2028-29 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन राबवली जाणार असून, त्यासाठी पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी नव्याने सुधारित सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीत नसलेल्या आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र असलेल्या कुटुंबांना आता घरकुलाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.