अलिबाग-नारायणपूर पायी दिंडीचे उद्या प्रस्थान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| अलिबाग | प्रतिनिधी |

सालाबादप्रमाणे यंदाही नारायण महाराज, दत्त देवस्थान सेवाभावी ट्रस्ट, श्रीक्षेत्र नारायणपूर, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्यावतीने दत्त जयंतीनिमित्त अलिबाग ते श्रीक्षेत्र नारायणपूर पायी दिंडीचे उद्या मंगळवार, दि. 25 नोव्हेंबर रोजी प्रस्थान होणार आहे. यंदा हे दिंडीचे 31 वे वर्ष आहे.

अलिबाग शहर व तालुका परिसरातून सुमारे 300 दत्तभक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. अलिबाग एसटी आगारातील श्री गणेश मंदिरामध्ये अभिषेक-पूजा, आरती करून दिंडी समुद्रकिनारी पोहोचेल. तेथे गंगा-सागरपूजन, पादुकापूजन, कलश व कावड सागर तीर्थाने भरून पालखीचे प्रस्थान होईल. अलिबाग बाजारपेठ, कोळीवाडा, चेंढरे, पिंपळभाटमार्गे खंडाळे येथे दुपारच्या प्रसादासाठी थांबणार आहे. पुढे तीनवीरा, कामार्ली, खोपोली, कामशेत, निगडी, रहाटणी-काळेवाडी, रास्तापेठ-पुणे, सासवड असा प्रवास करत दिंडी 3 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र नारायणपूर येथे पोहोचणार आहे.

दरम्यान, 2 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र नारायणपूर येथे 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञाचा 25 वा वर्धापन दिन होणार आहे. 3 डिसेंबर रोजी दुपारी येणाऱ्या सर्व दिंड्यांचे स्वागत- सांगता व संध्याकाळी 7 वाजून 03 मिनिटांनी दत्त जन्म सोहळा होणार आहे. 4 डिसेंबर रोजी रुद्र अभिषेक, होम हवन, पालखी ग्राम प्रदक्षिणा, चंद्रभागा कुंडावर देवांना स्नान, अभिषेक व मिरवणुकीने परत मंदिरामध्ये प्रवेश, मानपान, श्री टेंबे स्वामी महाराजांचे प्रवचन, मार्गदर्शन, महाआरती व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. तरी ङ्गङ्घयाची देही याची डोळा ङ्गङ्घ आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून या उत्सव पर्वाचा लाभ घ्यावा, असे नारायणपूर ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version