अलिबाग पंचायत समिती गण आरक्षण जाहीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग पंचायत समितीच्या गण आरक्षणाची घोषणा करण्यात आली असून, एकूण 14 जागांपैकी 9 जागा विविध प्रवर्गांसाठी राखीव ठरल्या आहेत. यापैकी तब्बल 7 जागा महिलांसाठी राखीव असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मोठे प्रतिनिधित्व दिसून येणार आहे.

घोषित आरक्षणानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात थळ (महिला) गणचा समावेश आहे, तर रुईशेत-भोमोली हा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहील. मागासवर्गीय प्रवर्गासाठी रेवदंडा (सर्वसाधारण), आवास (महिला) आणि वरसोली (महिला) हे गण निश्चित करण्यात आले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गात रामराज (महिला), चौल (महिला), किहीम (महिला), चेंढरे (महिला), आक्षी (सर्वसाधारण), शहापूर (सर्वसाधारण), काविर (सर्वसाधारण), वैजाळी (सर्वसाधारण) आणि आंबेपुर (सर्वसाधारण) या गणांचा समावेश करण्यात आला आहे. या आरक्षणामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाली असून, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचे वर्चस्व जाणवण्याची शक्यता आहे. नव्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आणि संभाव्य उमेदवार आता आपापली रणनिती आखण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी झालेल्या सभेत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Exit mobile version