| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागमधील दोन पानगाद्यांवर अलिबाग पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात गुटख्याचा साठा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आले आहे.
अलिबागसह रायगड जिल्ह्यात गुटखा व अन्य अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला होता. खुलेआमपणे अवैध धंदा चालविला जात होता. स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आंचल दलाल यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक म्हणून महिन्याभरापूर्वी पदभार हाती घेताच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला अवैध धंद्यांमुळे धोका होऊ नये, याकरीता ते बंद करण्यात यावे, अशी सक्त सुचना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना दिली होती. मात्र तरीही अवैध धंदे सुरुच होते.
अलिबाग शहरातील एसटी बस स्थानकाजवळील सरिता पान शॉप आणि रामनाथ जवळील आशापूरा मेडीकल येथील अर्थव पान शॉप येथे गुटखा विक्रीचा धंदा सूरू असल्याची माहिती मिळाली. एका त्रयस्थ व्यक्तींकडून गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन पान टपरीवर गुटखा छुप्या पध्दतीने विकला जात असल्याचे समजले. अखेर अलिबाग पोलीसांनी बुधवारी (दि.11) रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या दोन्ही दुकांनावर छापा टाकला. त्यांच्याकडे गुटख्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली.







